Nana Patekar File Photo
गोवा

Nana Patekar Goa Movies | नाना पाटेकर अन् गोव्याचे अनोखे सिनेमाई नाते; 'खामोशी' ते 'द कन्फेशन' चित्रपटांचा खास प्रवास

Nana Patekar Goa Movies | 'खामोशी'पासून 'द कन्फेशन'पर्यंतचा चित्रपट प्रवास

पुढारी वृत्तसेवा

पणजी : दीपक जाधव

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि गोवा यांचे नाते केवळ वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतही गोव्याने अनेक महत्त्वाच्या चित्रपटांना पार्श्वभूमी दिली आहे. गोव्याचा समुद्र, हिरवाई, जुन्या वसाहतकालीन वास्तू, गावाकडचे वातावरण आणि साध्या माणसांचे जगणे त्यांच्या काही चित्रपटांत ठळकपणे उमटले. विशेष म्हणजे काही चित्रपटांच्या कथानकातच गोव्याला महत्त्वाचे स्थान आहे.

'खामोशी : द म्युझिकल'

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'खामोशी : द म्युझिकल' हा नाना पाटेकर यांचा गोव्याशी जोडलेला महत्त्वाचा चित्रपट. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी जोसेफ ब्रागांझा ही व्यक्तिरेखा साकारली. सीमा विश्वास, मनीषा कोईराला आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा गोव्यातील कर्णबधिर दाम्पत्याभोवती फिरते. त्यामुळे गोवा केवळ चित्रीकरणाचे ठिकाण न राहता कथानकाचाच अविभाज्य भाग बनतो. गोव्याची ख्रिश्चन संस्कृती, घरांचे वातावरण आणि स्थानिक जीवनशैली यामुळे चित्रपटाला स्वतंत्र दृश्यात्मक ओळख मिळते.

'द पूल' : पणजीच्या रस्त्यांवरचा नाना

नाना पाटेकर यांच्या गोवा चित्रपट प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट म्हणजे अमेरिकन दिग्दर्शक ख्रिस स्मिथ यांचा 'द पूल'. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पणजीत झाले. नाना पाटेकर यांनी एका श्रीमंत कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारली आहे. एका तरुण मुलाची उत्सुकता आणि स्विमिंग पूलभोवती उलगडणारी कथा अशी त्याची मांडणी आहे. व्यावसायिक कलाकारांसोबत स्थानिक आणि अनुभवी कलाकारांचाही चित्रपटात वापर करण्यात आला.

पणजीतील श्रीमंती आणि गरिबीमधील विरोधाभास हा चित्रपटाच्या निवडीमागील महत्त्वाचा घटक असल्याचे दिग्दर्शक ख्रिस स्मिथ यांनी सांगितले होते. सुमारे ६५ दिवसांच्या चित्रीकरणात गोव्याचे रस्ते आणि स्थानिक जीवन चित्रपटाचा भाग बनले. 'द पूल'ला २००७ च्या सनडान्स चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. त्यामुळे गोव्याच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट नाना पाटेकर यांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवासासाठीही उल्लेखनीय ठरला.

'तडका' : गोव्याच्या रंगात रंगलेली प्रेमकथा

प्रकाश राज दिग्दर्शित 'तडका' हा नाना पाटेकर यांच्या गोव्यातील चित्रपट प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा. यात नाना पाटेकर, श्रिया सरन, अली फजल आणि तापसी पन्नू यांच्या भूमिका आहेत. अन्न, स्वयंपाक आणि नातेसंबंधांभोवती फिरणाऱ्या या कथेसाठी गोव्याची निवड करण्यात आली. गोव्याचे रंग, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक वातावरण कथेला योग्य पार्श्वभूमी देत असल्याचे निर्मात्यांनी म्हटले होते. चित्रपटाचे चित्रीकरण २०१६ मध्ये सुरू झाले. मात्र प्रदर्शनाला बराच विलंब झाला आणि अखेर २०२२ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला.

'द कन्फेशन' : नाना बनले फादर

अनंत महादेवन दिग्दर्शित 'द कन्फेशन' या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण २०२२ मध्ये गोव्यात झाले. नाना पाटेकर, आदिल हुसैन, आशिष विद्यार्थी, मकरंद अनासपुरे, नेहा महाजन, सुचित्रा पिल्लई, डॅनिल स्मिथ, गौतम रोडे, पंखुरी अवस्थी आणि मीनाक्षी मार्टिन्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोव्यातील चर्च, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तूंचा चित्रपटात वापर करण्यात आला आहे.

केरळमधील फादर बेनेडिक्ट आणि मरियाकुट्टी यांच्या गाजलेल्या प्रकरणापासून चित्रपटाची कथा प्रेरित आहे. नाना पाटेकर यांनी फादर बेनेडिक्ट यांची भूमिका साकारली आहे. गोव्यातील अभिनेत्री डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांच्यासह स्थानिक कलाकारांनीही यात काम केले आहे. २०२२ मध्ये चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रदर्शनाला विलंब झाला आणि अखेर २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

पडद्यावरचा गोवा आणि नानांचा अभिनय:

या चित्रपटांकडे पाहिल्यास नाना पाटेकरांच्या गोव्याशी असलेल्या सिनेमाई नात्याचे वेगवेगळे पैलू दिसतात. 'खामोशी'मध्ये गोवा कथानकाचा आत्मा आहे. 'द पूल'मध्ये पणजी आणि गोव्याचे सामान्य जीवन चित्रपटाच्या वास्तववादी शैलीचा महत्त्वाचा भाग आहे. तर 'तडका'मध्ये गोव्याचे रंग, खाद्यसंस्कृती आणि वातावरण कथेला हलकेफुलके रूप देतात.

'द कन्फेशन'मध्येही गोव्याच्या विविध स्थळांचा प्रभावी वापर झाला आहे. नाना पाटेकरांच्या अभिनयाची ताकद त्यांच्या आवाजात आणि संवादफेकीत आहे. मात्र गोव्याच्या भूमीने त्यांच्या काही व्यक्तिरेखांना वेगळे मौन, रंग आणि संवेदनशीलता दिली. 'खामोशी'पासून 'द पूल', 'तडका' आणि 'द कन्फेशन'पर्यंतचा हा प्रवास एका अभिनेत्याच्या आणि एका प्रदेशाच्या पडद्यावर जुळलेल्या नात्याची कहाणी सांगतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT