पणजी : फोंड्यात केलेल्या भाषणातील माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला आहे. मी कधीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात काहीही बोललो नाही. त्यांनी नेहमीच मला साथ दिली असून, आमच्यात चांगले संबंध आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री गोविंद गावडे यांनी आज दिले आहे.
मंत्री गावडे म्हणाले, मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी आधीच बोललो आहे. त्यांनी काय वक्तव्य केले, यावर मी काही भाष्य करणार नाही. पण आमच्यात कोणताही वाद नाही. आमचा उद्देश एकच गोव्याच्या विकासासाठी एकत्र काम करणे, हा आहे. मंत्री गावडे यांनी माध्यमांवर टीका करत पक्षांतर्गत कोणतेही मतभेद नसल्याचेही म्हटले आहे.
पणजी : आदिवासी कल्याण खात्यावर पर्यायाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केल्यामुळे वादात सापडलेले कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी प्रियोळ-ते पर्वरी प्रवासादरम्यान वाहने बदल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची राजकीर वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.
फोंड्यात झालेल्या प्रेरणा दिन सोहळ्यात आदिवासी कल्याण खात्यावर जोरदार टीका करताना खातेच बंद केलेले बरे असे उद्गार काढले होते. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करून गावडे यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्यासह सर्वच नेत्यांनी गावडे यांच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे. गावडे यांनी यापूर्वीही मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांना मारण्याची धमकीही दिली होती. कला अकादमीच्या बांधकामावरून ते वादात सापडलेले आहेत. यात भर म्हणून परवाचे त्यांचे थेट सरकारवरील आरोप यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.
बुधवारी 28 रोजी मंत्री गावडे हे बाणस्तारी मार्गे सरकारी कारमधून आले. जुने गोवेला बायपास रस्त्यावर नरेंद्र महाराज मठाच्या समोरील उड्डाणपुलाखाली त्यांनी सरकारी कार थांबवली. त्यातून उतरत काळ्या रंगाच्या खासगी कारमध्ये बसले व पुढचा प्रवास केला. मात्र, पर्वरी येथील मंत्रालयात त्यांनी सरकारी कारने पोहोचले. त्यामुळे जुने गोवे ते पणजी या प्रवासात खासगी कारने प्रवास करण्याचे कारण काय? त्या खासगी कारमध्ये अन्य कोण होते? त्या कारमधून ते नेमके कुठे गेले होते, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.