पणजी ः संगीत आनंददायी व अर्थपूर्ण जीवन जगण्याचे साधन आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात जिथे शब्द संपतात तिथे स्वर व संगाताच्या माध्यमातून भावविश्व निर्माण करण्याची ताकद आहे, त्यामुळे ते श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.
कला अकादमीच्या मा. दिननाथ मंगेशकर कला मंदिरात स्वस्तीक संस्थेतर्फे आयोजित 14 व्या तीन दिवशीय शास्त्रीय संगीत व नृत्याच्या स्वरमंगेश महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर प्रा. अनिल सामंत बोलत होते. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, पीएनजीचे सचिन तांबे, विलास गावस देसाई, स्वस्तीकच्या सचिव येोगीता याजी, अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, विनयकुमार मंत्रवादी, उद्योजक राजेश तारकर व बँक ऑफ इंडियाचे सरव्यावस्थापक विनोदचंद्र अरवादीया व्यासपीठावर होते.
पुढे बोलताना प्रा. सामंत म्हणाले की जिथे शब्द संपतात तिथे सुर व संगीत सुरू होत, डॉ. प्रवीण गावकर यांनी गोव्यातल्या तरुणाईला जी पाश्चात्त्य संगीतामध्ये धावत होती या तरुणाईला भारतीय संगीताकडे ओढून आणण्याचा मोठं काम स्वस्तीक संस्थेच्या माध्यमातून केले आहे. गोमंतकाच्या सांगीतिक इतिहासामध्ये त्यानी अनेक प्रयोग केले. नवोदितांना व्यासपीठ देऊन त्याना प्रोत्सह देत आहेत. सुरांचा रियाज आणि योग यांची सांगड घालणारा कार्यक्रम ते आयोजित करतात, त्याची एक नवीन दृष्टी आपल्या लक्षात येते, असे प्रा. सामंत म्हणाले. यावेळी राजेश तारकर व विनयकुमार मंत्रवादी यांची भाषणे झाली. स्वरमंगेश महोत्सवात उद्या दि. 6 व परवा दि. 7 रोजी देशभरातील नामांकित शास्त्रीय गायकांच्या मैफली व प्रसिध्द नृत्य कलाकारांचे कार्यक्रम सादर होणार असून प्रवेश मोफत आहे.