पुणे येथील व्यावसायिक आणि कारवार येथील मूळ रहिवासी विनायक उर्फ राजू नाईक यांची २२ सप्टेंबर रोजी हत्या झाली होती. Pudhari
गोवा

Murder Case | खून कारवारात, संशयिताचा मृतदेह गोव्यात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुणे येथील व्यावसायिक आणि कारवार येथील मूळ रहिवासी विनायक उर्फ राजू नाईक यांची २२ सप्टेंबर रोजी पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून हत्या केली होती. विनायक नाईक यांच्या हत्येचा संशय असलेला गुरुप्रसाद राणे याचा मृतदेह घटनेच्या अवघ्या चौथ्या दिवशी मांडवी खाडीत दिवाडी फेरी धक्क्याजवळ आढळल्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

याप्रकरणी कारवार पोलिस नाईक यांच्या पत्नीचीही चौकशी करत असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

कारवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवार तालुक्यातील तालुक्याताल हणकोण येथे रविवारी २२ रोजी पहाटे ५.३० वा. नाईक यांच्या घरात घुसून पाच जणांच्या टोळीने त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांची हत्या केली होती. नाईक हे पुणे येथील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचा व्यवसाय करत होते. नाईक हे जत्रेनिमित्त हणकोण येथे आपल्या मूळ गावी आले होते. रविवारी ते पुन्हा पुण्याला जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात नाईक यांची पत्नीदेखील गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर कारवार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा तपास सदाशिवगड चित्तपूर पोलिस करत असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार गुरुप्रसाद राणे (रा. फोंडा-गोवा) हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, बुधवार दि. २५ रोजी सकाळी गुरुप्रसाद राणे याचा मृतदेह मांडवी खाडीत दिवाडी फेरी धक्क्याजवळ सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुरुप्रसादच्या दारूच्या कंपन्या

गुरुप्रसाद राणे हा फोंडा येथील रहिवासी होता. तो व्यावसायिक असून त्याच्या मडकई आणि शिरोडा येथे दारू तयार करण्याच्या कंपन्या आहेत. त्यामुळे गुरुप्रसाद याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला, याचा तपास जुने गोवे पोलिस करत आहेत.

पत्नीने पटवली ओळख

दिवाडी फेरी धक्क्याजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहावरील कपड्यांमध्ये एक ओळखपत्र सापडले होते. त्यावरून तो मृतदेह गुरुप्रसाद राणे याचा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. मात्र, अनेक समाज माध्यमांवर तो मृतदेह अन्य कोणाचा असल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी त्याच्या पत्नीला पाचारण केले होते. पत्नीने तो मृतदेह गुरुप्रसाद याचाच असल्याने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT