दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पतन प्राधिकरणाने (एमपीए) सडा, मुरगाव येथे 'मुरगावचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर बुधवारी (दि. ४) सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात कुंपण घालण्याचे काम सुरू केले. या जागेवरील अनधिकृत शेड (मंडप) गेल्या महिन्यात पाडण्यात आली होती. तेथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये आणि जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी एमपीएने कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारवाईसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्त पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बुधवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. कुंपण उभारण्याचे काम शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पाडावे, यासाठी घटनास्थल मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि एमपीएचे वरिष्ठ अधिकारी या कामावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते.
दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मुरगावचे मामलेदार प्रवीणजय पंडित, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलिस अधीक्षक नालास्को रापोझ, मुरगावचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, मुरगाव पोलिस निरीक्षक शौरिफ जॉकिस, एमपीएचे अधिकारी तसेच अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कुंपण उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.
कुंपण उभारण्याचे काम बुधवारी उशिरा संध्याकाळपर्यंत किंवा गुरुवारी पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. काम सुरू असताना जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थल उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवल्याचे दिसून आले.