मडगाव : पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई आणि नीलेश राणे यांच्याशी हुज्जत घालताना प्रतिमा कुतिन्हो. File Photo
गोवा

गोवा : आंदोलन स्थगित; 500 जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

पणजी/मडगाव : ‘भारत माता की जय’ संघटनेचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित वक्तव्यानंतर राज्यभर आंदोलन आणि प्रतिआंदोलन सुरू होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रविवारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी प्रतिमा कुतिन्हो, सावियो कुतिन्हो, सांगेचे नगरसेवक मेश्यू डिकॉस्ता आणि वॉरन आलेमाव यांच्यासह अन्य पाचशे जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या नऊ कलामांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेलिंगकर यांना अटक करू नये, आणि जर अटक झाली तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशारा हिंदू संघटनांच्या प्रतिनिधी रविवारी म्हापसा येथील सभेत दिला आहे. दरम्यान, चर्च संस्थेने आपला निषेध शांतता मार्गाने व्यक्तकरण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

आंदोलनाच्या नावाखाली सलग दोन दिवस दक्षिण गोव्यात अशांतता निर्माण करणार्‍या आंदोलकांवर लाठ्या बसल्यानंतर त्यांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची हिंमत केली नाही. रविवारी कोलवा सर्कलवर पुन्हा चक्काजाम करण्याचे नियोजन अपयशी ठरले. लाठ्या घेऊन पोलिस सज्ज होते. त्यामुळे अनेकजण आंदोलनस्थळी फिरकलेच नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची वेळ नेत्यांवर आली.

शनिवारी झालेल्या लाठीचार्जाचा धसका आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. मागील दोन दिवस पोलिसांनी आंदोलकांच्या कृत्याकडे डोळेझाक केली होती. त्यामुळे पुन्हा राविवारी कोलवा सर्कल बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे आंदोलनकर्त्यांचा दुसरा गट आलाच नाही. शनिवारी दुचाकीस्वाराला मारहाण करण्याबरोबर त्यांच्या अन्य कारनाम्यावरून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पोलिसही अ‍ॅक्शन मोड मध्ये आले होते. रविवारी सकाळी प्रतिमा कुतिन्हो आणि त्यांचे इतर सहकारी कोलवा सर्कल जवळ पोचताच पोलिस उपअधीक्षजक संतोष देसाई, नीलेश राणे, पोलिस निरीक्षक कपील नायक, तुळशीदास नायक पोलिस कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. संतोष देसाई यांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्याशी चर्चा करून रस्ता अडवू नका, अशी सूचना केली. आंदोलन संपुष्टात आले असून निदर्शनेही करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कुतिन्हो यांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यामुळे उपस्थित जमावाने घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. काही लोक जबरदस्तीने रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करू लागताच पोलिसांना सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्याचवेळी प्रतिमा कुतिन्हो यांनी नमते घेत आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करुन लोकांना आपापल्या घरी जाण्याचे आवाहन करताना प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या जामीनाविरोधात जोरदार बाजू मांडणार असल्याच्या त्या म्हणाल्या.

मडगावात शुक्रवारपासून हा गोंधळ सुरू होता. प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह सावियो कुतिन्हो, वॉरन आलेमाव, नगरसेवक मॅश्यू डिकॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रा. वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत फातोर्डात चक्काजाम केला होता. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनीही आंदोलकांशी अनेकदा चर्चा करूनही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहीले. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांनी रस्ता न सोडल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मडगाव येथे झालेल्या या आंदोलनामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध नागरिकांना मोठा फटका बसला. डिचोली पोलिस स्थानकात वेलिंगकर यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. यासाठी वेलिंगकर यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या सुनावणीकडे लागल्या आहेत. पोलिसांनी वेलिंगकर यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली असून त्यांच्या पणजी येथील घरावर दुसर्‍यांदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस लावली आहे.

प्रा. वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणीची मागणी केली होती. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून मडगावात आंदोलन करण्यात आले होते. प्रा. वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत जमावाने शुक्रवारी रात्री मडगावात रस्ता अडवून चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले होते. शनिवारी सकाळी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह अन्य नेत्यांनी कोलवा सर्कल जवळ जमाव करून मडगावात येणार्‍या प्रमुख रस्त्यांसह, कोलवा, रवींद्र भवन मार्ग, माथानी साल्ढाणा संकुलापर्यत जाणारा मार्ग बंद करून केला होता. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या आंदोलनामुळे रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.

पोलिस उपनिरीक्षक आतिकेश खेडेकर यांनी पाचशे आंदोलकांच्या विरोधात तक्रार नोंद केली. यात प्रामुख्याने प्रतिमा कुतिन्हो, त्यांचे चालक जोएल, सावियो कुतिन्हो, फिडोल, कुंकळ्ळीचे सावियो डायस, उपसरपंच जॉसी डायस, सांगेचे नगरसेवक मेश्यू डिकॉस्ता, जोस डी एरियलचे पीटर व्हिएगस, सबिनास मस्कारेन्हास, फ्रँकी डिमेलो, वॉरेन रेबेलो, एव्हरसन, सां जुझे दी आरियलचे फ्रेडी ट्रावासो, पॉल फर्नांडिस, फ्रँकी- कार्मो, क्लाइव्ह कार्डोझो, नेव्हिल फर्नांडिस आदींचा समावेश आहे. या सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम 189 (2) (3), (5) 285, 223 (अ) (ब), 126 (2), 125, 324 (1), 132, 15 (2), 191(2) आणि राष्ट्रीय महामार्गाचे कलम 8 (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाब्दीक चकमक...

प्रतिमा कुतिन्हो यांनी रविवारी पुन्हा आंदोलनाची तयारी करीत असताना पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलन करू नका, असे प्रतिमा यांना सांगताच त्यांनी पोलिसांवरच आवाज चढविला. त्यामुळे उपअधीक्षक नीलेश राणे व प्रतिमा यांच्या जोरदार शाब्दीक चकमक उडाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT