पणजी : पुढारी
वृत्तसेवा मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी वाढली आहे. कोळसा हाताळणीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. हवा प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे 'कोळसो आमका नाका' अशी घोषणाबाजी करत विरोधी आमदारांनी मंगळवारी सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठी पहिली परवानगी भाजप सरकारने नव्हे, तर काँग्रेस सरकारने दिली होती.
आपल्या काळात कोळसा हाताळणीची मर्यादा वाढवली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासाला केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी 'मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी आणि प्रदूषण' या विषयावर प्रश्न उपस्थित केला. मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी पूर्णपणे बंद करा, अशी मागणी केली.
केंद्रीय पर्यावरण खात्याचा परवाना नसतानाही येथे कोळसा हाताळणी सुरू आहे. कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्य सरकारला कर देत नाहीत, असा दावा त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोळसा हाताळणी बंद करणार, असे सांगितले होते. त्यांचा वारसा जपण्यासाठी कोळसा हाताळणी बंद करा, अशी मागणीही डिकॉस्टा यांनी केली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी संसदेत काँग्रेसचे खासदार विरिएतो फर्नांडिस यांना जे उत्तर मिळाले आहे त्या उत्तरात मुरगावात पाच ठिकाणी कोळसा हातळणी होत असल्याचे सांगितले आहे. गोवा सरकार तीन ठिकाणी म्हणते. ही तफावत कशी, असा प्रश्न उपस्थित केला. येथील कंपन्यांकडून महसूल वसुली करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आलेमाव यांनी केला.
विरोधकांची जोरदार घोषणाबाजी...
त्यावर भाजप सरकारने कोळसा हाताळणी सुरू केली नाही. आपल्या काळात हाताळणी वाढलेली नाही. प्रदूषण नियंत्रणात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी लोकांची दिशाभूल करू नये, असेही ते म्हणाले. मात्र, विरोधकांचे मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही, त्यांनी सभापतीच्या समोर धाव घेत 'कोळसो आमका नाका' अशी जोरदार घोषणाबाजी केली.