पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राज्य प्रशासनाने पेडणे तालुक्यातील मोरजी समुद्रकिनाऱ्यावरील टेंमवाडा येथे सीआरझेड (किनारपट्टी नियमन क्षेत्र) नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या २३ बेकायदेशीर बांधकामांवर सोमवारी धडक कारवाई केली. अवजड यंत्रसामग्री व बुलडोझरच्या साहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक व्यावसायिक दिलीप मोरजे यांच्यासह अन्य दहा जणांच्या अनधिकृत बांधकामांचाही समावेश होता. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) यापूर्वीच संबंधित बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.
मात्र, जिल्हा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली.