पणजी : भारतीय उपखंडासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा असणारा मान्सून मागील वर्षीप्रमाणे, यंदाही शेतकर्यांना सुखावण्याची शक्यता आहे. मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचाही परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत राज्यात दाखल होईल, अशी माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संशोधक आणि मान्सून अभ्यासक डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी दिली आहे.
डॉ. रमेशकुमार म्हणाले, स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा पूर्व अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापुढील अनुमान 15 मे दरम्यान व्यक्त करण्यात येईल. यात मान्सूनची एकूण अचूकता स्पष्ट होईल.
मात्र, अनेक वर्षांपासून केलेल्या अभ्यासाच्या आधारे असे म्हणता येईल. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचाही परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये वेळेत 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल, 7 किंवा 8 जूनला तो महाराष्ट्रात सुरू होईल. गेल्यावर्षी भारतीय उन्हाळी पावसावर मान्सून ट्रफ आणि ऑफशोअर ट्रफ यासारख्या स्थानिक सिनोप्टिक परिस्थितीचा परिणाम झाला होता.
केरळमध्ये तो 30 मे रोजी, म्हणजे 1 जून या त्याच्या नेहमीच्या आधी आला होता. देशात मान्सूनचा पाऊस जोरदार होता. संपूर्ण देशात 967.2 मिमी पाऊस पडला, जो हवामानशास्त्रीय सरासरी 900.4 मिमी पेक्षा 7 टक्के जास्त होता.
गेल्यावेळी जुलैमध्ये मान्सूनच्या पावसाची तीव्रता अधिक होती. 8 जुलै 2024 रोजी गोव्यात एकाच दिवशी 235 मिमी इतका विक्रमी पाऊस पडला होता. गेल्या 124 वर्षांतील हा सर्वात जास्त पाऊस जुलै होता. जुलैच्या अखेरीस, बहुतेक पर्जन्यमापक केंद्रांवर 100 इंचापेक्षा जास्त पाऊस पडला, एकूण हंगामी सरासरी फक्त दोन महिन्यांतच पूर्ण झाली होती. गोव्यात दोन ठिकाणी 5000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही ठिकाणी 4000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. दाबोळीच्या पर्जन्यमापक केंद्रात सर्वात कमी 138 इंच (3512.1 मिमी) पाऊस पडला, तर वाळपईमध्ये 217 इंच (5536.2 मिमी) पाऊस पडला. 36 हवामानशास्त्रीय उपविभागांमध्ये गोवा राज्य सर्वात जास्त प्रभावित झालेल्या प्रदेशांपैकी एक होते.