पणजी : पुढारी वृत्तसेवा
'मोग आसूं' या कोकणी चित्रपटाने ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा (बेस्ट फीचर फिल्म इन कोकणी) पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारामुळे कोकणी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळाले आहे.
गोमंतकीय कलाकार आणि चित्रपटकर्मींमधून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'मोग आसूं' अर्थात 'प्रेम राहू दे' या चित्रपटाचे दिग्दर्शन आग्नेलो ब्रागांझा आणि राधेश्याम पिपलवा यांनी केले आहे. गोव्यात चित्रित केलेल्या या चित्रपटाची संकल्पना फँटसी आणि मानवी भावनांवर आधारित आहे.
एका विधुर पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. ज्याला ख्रिसमसच्या काळात आपल्या दिवंगत पत्नीचा आत्मा भेटतो. ती त्याला जुन्या दुःखातून बाहेर पडण्यास आणि आयुष्यात नव्या प्रेमाचा स्वीकार करण्यास मार्गदर्शन करते. या अनोख्या कथानकामुळे चित्रपटाला वेगळे स्थान मिळाले आहे.
'मोग आसूं' चित्रपटात पूरब कोहली, अंजली पाटील यांच्यासह गोव्यातील प्रसिद्ध कलाकार प्रिन्स जेकब आणि जॉन डीसिल्व्हा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाला मायरॉन एस्तिबेरो यांनी संगीत दिले असून, चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'मोग आसूं' ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.