सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गेल्या स महिनाभरामध्ये मिरजेच्या राजकारणात जे काही बघायला मिळाले, ते जनतेच्या सोडाच, पण त्या राजकारण्यांच्या तरी पचनी पडले का? हा प्रश्न सतावतो आहे. कोण कोणत्या पक्षात जातो आणि कोणता पक्ष कोणाला त्यांच्या पक्षात घेतो, यावरून हे सगळं कोणत्या विकासासाठी चाललंय, हे मात्र कळता कळत नाही.
कदाचित 'हाच तो मिरजेच्या विकासासाठी कारभाऱ्यांनी घेतलेला ध्यास असेल का?' असेदेखील उपहासात्मकपणे म्हणावे लागेल. मिरज शहर ही आरोग्यपंढरी आहे, संगीतनगरी आहे आणि फुटबॉलनगरीदेखील आहे. इथं रेल्वेचं मोठं जाळं आहे. कर्नाटक राज्याला काही अंतरावर जोडणारे हे शहर आहे. या शहराच्या विकासाचे घोडे नेमके इतके दिवस कुठे अडले असेल ? शहरात अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. या समस्यांचा डोंगर आहेच. पण काही प्रश्न या कारभाऱ्यांना विचारावेसे वाटतात.
मिरज हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू आहेत. त्या वास्तू जपण्यासाठी कारभाऱ्यांनी कितीसा पुढाकार घेतला? किती वास्तू जपल्या गेल्या ? एखादे ऐतिहासिक संग्रहालयदेखील कुणाला सुरू करता आलेले नाही. ज्या लक्ष्मी मार्केटच्या इमारतीचा फोटो हे कारभारी आपल्या फोटोबरोबर लावतात, त्या लक्ष्मी मार्केटची अवस्था किती बिकट झाली आहे?, हे कारभाऱ्यांना दिसत नसावे का? ही इमारत खरोखरच ऐतिहासिक संग्रहालय सुरू करण्यासारखी आहे.
पण त्यासाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. त्यामुळे या कारभाऱ्यांना मिरजेच्या 'ऐतिहासिक' या शब्दाचा विसर पडलेला आहे, असे म्हणावे का ? मिरजेची वैद्यकीय परंपरा ही खूप मोठी आहे. इथल्या डॉक्टरांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे आणि ती वाढवलेलीदेखील आहे. मिरजेच्या आर्थिक उलाढालीमध्ये या सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयांचा सर्वात मोठा वाटा आहे. मिरजेत डॉक्टर्स आणि रुग्णालये नसती, तर कदाचित मिरज हे एका आदिवासी भागासारखे असते. या रुग्णालयांसाठी आणि येथे येणाऱ्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी कोणत्या सुविधा या कारभाऱ्यांनी दिल्या ? या प्रश्नाचे उत्तर शोधूनदेखील - सापडणार नाही.
मिरजेची वैद्यकीय इंडस्ट्री ही केवळ डॉक्टरांमुळे वाढली. परदेशातून मिरजेत येऊन वैद्यकीय सेवा देत डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी मिशन हॉस्पिटल सुरू केले. पूर्वीपासून वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध असलेले हे मिशन (वॉन्लेस) हॉस्पिटल आज बंद पडलेले आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. महापालिकेच्या किती कारभाऱ्यांनी हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले? आता काहींचा डोळा त्या रुग्णालयाच्या जागेवर आहे, हेच सत्य. मिरज ही संगीतनगरी आहे. इथल्या फरीदसाहेबांनी पहिली सतार बनविली. ज्या सतारीचा सूर आज देश-विदेशात ऐकायला मिळतो.
इथल्या सतारीची, तबल्याची आणि अन्य तंतुवाद्यांची भुरळ जगभरात आहे. त्या तंतुवाद्यांसाठी शासनाने क्लस्टर मंजूर केले आहे. येथे भारतातील पहिले तंतुवाद्यांचे संशोधन केंद्र सुरू होणार आहे. मात्र या संशोधन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम निधीअभावी ठप्प आहे. त्या संशोधन केंद्रासाठी महापालिकेच्या कारभाऱ्यांनी आजपर्यंत काय केले? हे कारभारी संगीतनगरी म्हणून मिरजेची परंपरा जपणार नाहीत का ? फुटबॉलनगरी अशीही मिरजेची एक ओळख. अनेक राष्ट्रीय खेळाडू येथे तयार झाले. या फुटबॉल खेळासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे एकमेव मैदान आहे.
या क्रीडांगणावर कोट्यवधी रुपयांचा निधी आजवर खर्च करण्यात आला. मात्र पावसाळ्यात या क्रीडांगणाचे अक्षरशः तलावामध्ये रूपांतर होते. या फुटबॉल खेळासाठी आणि या क्रीडांगणासाठी या कारभाऱ्यांनी काय केले? मिरजेच्या विकासासाठी माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. मिरजेच्या इतिहासात कोणत्याच नेत्याने इतका निधी आणला नाही. यापैकी मोठा निधी अनेकवेळा या कारभाऱ्यांना विविध विकास कामांसाठी देण्यात आला, पण महापालिकेच्या कारभाऱ्यांनी शहराचा विकास केला नाही, हेच सत्य. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या बक्षिसाचे काय झाले ? २०१८ च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बक्षीस म्हणून महापालिकेच्या प्रलंबित विकास कामांसाठी १००0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या १०० कोटी रुपयांपैकी सुमारे ४० कोटी रुपये मिरजेत खर्च झाले. या ४० कोटी रुपयांपैकी किती निधी योग्यरित्या खर्च झाला? कोणती कामे मार्गी लागली? याचाही विचार झाला पाहिजे.