माध्यमांशी बोलताना मंत्री सुभाष फळदेसाई. 
गोवा

पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार - मंत्री सुभाष फळदेसाई

Subhash Phal Desai election- एसटींना राजकीय आरक्षण मिळणे हा निर्णय ऐतिहासिक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव :सांगे मतदारसंघ अनुसूचित जमाती आरक्षणाच्या कक्षेत आल्यानंतर आपल्या राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चावर आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष मला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी खात्री व्यक्त केली आहे. आमदारकी राहिली नाही तरी जनसेवा थांबणार नाही. भाजप सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो शिरोधार्ह असेल, असे ठामपणे सांगत त्यांनी एसटी समाजाला मिळालेल्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले.

एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत फळदेसाई म्हणाले की, भाजपमुळेच गावडा आणि कुणबी, वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. त्यानंतर या समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठीही पक्षाने सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचीच ही फलश्रुती असून एसटी समाजाला आता लोकप्रतिनिधित्वाची मोठी संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी केपे येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले.

राजकीय आरक्षणामुळे सांगे मतदारसंघाच्या भवितव्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच आपण कोणत्याही प्रकारे अस्वस्थ नसल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. माझ्यासाठी वैयक्तिक राजकारणापेक्षा पक्षाची भूमिका आणि देशसेवा अधिक महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. आमदारकी हेच जनसेवेचे एकमेव माध्यम नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी आमदार असणे आवश्यक नाही.

भविष्यात मी आमदार राहिलो नाही तरी त्याचे मला कोणतेही दुःख नाही. संघटनात्मक कामाच्या पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी मी माध्यमातूनही जनतेची सेवा करता येते. प्रामाणिकपणे पार पाडेन.

एसटी समाजासाठी अधिकाऱ्यांशी संघर्ष

खात्याच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जमातीच्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी अनेकदा वन विभागातील अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागला. एसटी समाजाच्या हितासाठी काम करताना अनेक वेळा वनाधिकाऱ्यांशी मतभेद झाले. मात्र, समाजाच्या प्रश्नांवर कधीही तडजोड केली नाही, असे त्यांनी नमूद केले.

एसटी समाजाला सक्षम नेतृत्वाची गरज

एसटी समाजाच्या प्रश्नांची जाण त्या समाजातील लोकप्रतिनिधींनाच अधिक चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे राजकीय आरक्षणामुळे या समाजाला स्वतःचे नेतृत्व घडविण्याची संधी मिळणार असून त्यातून विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या समाजातून सक्षम नेतृत्व पुढे आले, तर त्यांच्या प्रश्नांचे निराकरण प्रभावीपणे होईल आणि सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले.

दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचविला

सांगे मतदारसंघ हा विस्तीर्ण मतदारसंघांपैकी एक असून आपल्या कार्यकाळात दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचविण्याचे काम केल्याचा दावा फळदेसाई यांनी केला. शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना आणि सुविधा पोहोचाव्यात, यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तुडवा, काजूगोटोव, मानगाळ, साळजिणी, कार्ला, वेर्ले आदी भागांमध्ये पूर्वी रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. या भागांत अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. दर तीन महिन्यांनी या दुर्गम भागांचा दौरा करून विकासकामांचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT