डिचोली : पत्रकारांनामाहिती सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूस आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट.  Pudhari File Photo
गोवा

मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण शिष्टाई

सारमानस-पिळगाव येथील खाण वाहतूक प्रश्न; कंपनी, कामगार, शेतकर्‍यांसह वेगळी बैठक

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : सारमानस-पिळगाव येथील खनिज वाहतूक 22 दिवस बंद आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी कंपनी व्यवस्थापन, कामगार, ट्रकमालक तसेच शेतकरी यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन निर्णायक तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न करताना महत्त्वपूर्ण शिष्टाई केली आहे.

या संदर्भात, मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, शेतकर्‍यांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी अर्धे शेतकरी तयार असून, काही शेतकर्‍यांचा प्रश्न आहे त्याबाबत वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेण्याबाबत कंपनीला आदेश दिले आहेत. कपात करण्यात आलेल्या कामगारांचा जो विषय आहे, तो चालू असून, त्यावरही तोडगा काढण्यासाठी कंपनीने त्यांना अतिरिक्त भरपाई देऊन प्रश्न निकालात काढण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खाणी सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, ट्रकवाले यांचे जे काही प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी कंपनीने विविध पर्यायांमार्फत सहकार्य करण्यास सांगितलेले असून निश्चितपणे हे सर्व प्रश्न सुटून खाण वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे व या प्रश्नी निश्चितपणे तोडगा निघणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी सकाळी कंपनीचे अधिकारी, शेतकरी व काही कामगार तसेच ट्रक व्यावसायिकांसह वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, आमची शेती उद्ध्वस्त झाल्याने ती पूर्ववत करून देण्याची मागणी शेतकर्‍यांची आहे. आजही काही शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांशी व अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्री तोडगा काढतील, अशी आशा आम्हाला आहे, अशी माहिती कायदा सल्लागार अजय प्रभू गावकर व शेतकरी प्रतिनिधींनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काही शेतकरी तोडग्यासाठी तयार झाल्याची माहिती पत्रकारांना दिली. इतर विषय आहेत. त्यावर योग्य तोडगे काढले जातील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्याने पुन्हा एकदा खनिज वाहतूक सुरू करण्याबाबत सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर व सचिव सुभाष किनळकर यांनी खाण वाहतूक वेळेवर सुरू होणे गरजेचे असून तसे न झाल्यास आमच्यावर मोठे संकट येईल. सरकारने अथक प्रयत्नाने खाण व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे आता इतर गोष्टी आहेत त्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असून कोणीही रस्ता अडवू नये, सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आल्यास तो अडवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगितले. आम्ही लाखो रुपये खर्चून ट्रक घेतले आहेत. अनेक दिवस ते बंद असल्यामुळे व्यावसायिक संकटात आहेत. तातडीने खाण वाहतूक सुरू होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

निश्चितपणे न्याय मिळेल : प्रभुगावकर

कामावरून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर घेणे, शेतकर्‍यांचा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे. सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करणे हे नियमबाह्य आहे. यासाठी पुन्हा पर्यावरणीय सुनावणी घेणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळवून देतील, कामगारांनाही न्याय देतील, अशी आशा कायदा सल्लागार अजय प्रभुगावकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT