पणजी : म्हादई अभयारण्यात चोर्ला घाटातील जंगलात वन खात्याने बसवलेल्या कॅमेर्यात पट्टेरी वाघीण आपल्या तीन बछड्यांसह द़ृष्टीस पडल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केल्यानंतर, विरोधी पक्षासह अनेक पर्यावरणप्रेमींनी म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र जाहीर करा, अशी मागणी सुरू केली आहे. मात्र, वन खात्याने ‘ती’ वाघीण व तिचे बछडे हे म्हादई अभयारण्यातील नाहीत. सदरचा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला आहे. लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करू नका, असेही आवाहन वन खात्याने केले आहे.
याबाबत ‘म्हादर्ई बचाव अभियान’चे संयोजक व पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी म्हटले, की गोव्यात वन खात्याच्या कॅमेर्यात दिसलेली वाघीण ही देशभरातील कोणत्याही डेटाबेसमध्ये नोंद नसलेली आहे. रात्रीच्यावेळी ट्रक चालकांनी गोव्यातून कर्नाटककडे जाताना चोर्लाघाटात पट्टेरी वाघ पाहिल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र क्षेत्र संरक्षित करण्याची शिफारस गोवा सरकारला केली आहे. तिचे पालन व्हायला हवे.
यापूर्वी 2013 मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) परेश पोरोब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रानडुकराचे मांस खाणार्या वाघिणीला पाहिले होते. 2015 मध्ये संवर्धन प्राणीशास्त्रज्ञ के. उल्हास कारंथ यांच्या नेतृत्वाखालील टीमला गोव्यात वाघांचा अधिवास आढळला होता. पणसुले भागातून वाघ महाराष्ट्राकडे जाताना त्यांनी पाहिले आहे. असे अनेक पुरावे वाघाच्या अस्तित्वाचे आहेत. यापूर्वी राज्य सरकार गोव्यात वाघ नसून, ते कर्नाटक आणि महाराष्ट्रातून वारंवार येत असल्याचे सांगत होते. मात्र, राज्यात वाघांचे अस्तित्व असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारला आता निर्णय घ्यावा लागेल, असे प्रा. केरकर म्हणाले. अभयारण्यात खाणकाम आणि इतर प्रकल्प राबवायचे असल्यामुळे राज्य सरकार व्याघ्र प्रकल्प घोषित करत नाही. सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचित केले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी व्यक्त केले आहे.
सत्तरी, धारबांदोडा व सांगे तालुका म्हादई अभयारण्य परिघात आहे. म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र झाले तर या तालुक्यातील जे लोक वनक्षेत्रात राहतात त्यांच्या दैनंदिन जीवनावर बर्याच मर्यादा येणार आहेत. त्यामुळे काहीजण व्याघ्र राखीव क्षेत्राला विरोध करत आहेत, असे प्रा. केरकर म्हणाले.
गोवा वन खात्याने एक पत्रक काढून सोशल मीडियावर एक वाघीण आणि तीन बछड्यांचा जो व्हिडिओ फिरत आहे व काही बातम्यांबाबतचे जे वृत्त दिले आहे ते फेटाळले असून सदर व्हिडिओ 3 वर्षे जुना असून त्याचा गोवा राज्याशी संबंध नाही. म्हादई अभयारण्यात लावलेल्या कॅमेर्यात हल्लीच्या काळात पट्टेरी वाघ ट्रॅप झालेला नाही. असा वनखात्याने दावा केला असून सोशल मीडियावर अफवा न पसरविण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे.
म्हादई अभयारण्यात वाघीण आणि तिचे तीन बछडे दिसल्याची जी चर्चा आहे, त्यानुसार सरकारने व्याघ्र राखीव क्षेत्र अधिसूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. सरकार अधिसूचना काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘पश्चिम घाटात व्याघ्र संवर्धनाची गरज आहे; पण हे सरकार वाघांचे अस्तित्व मान्य करायला तयार नाही. त्यांना आमची जमीन विकून जंगलांचे रूपांतर काँक्रिटच्या जंगलात करायचे आहे’, असा आरोप आलेमाव यांनी केला आहे.