फोंडा : फोंड्यातील धोकादायक ठरलेल्या मासळी मार्केट इमारतीतील व्यापार्यांनी मंगळवारी स्थलांतरास सुरुवात केली आहे. मात्र कपड्यांच्या व्यापार्यांना अजून दुकाने दिली नसल्याने त्यांचे स्थलांतर अडून पडले आहे. फोंडा पालिकेने या दुकानांसंबंधीची प्रक्रिया पूर्ण करताच कपडे व्यापारी स्थलांतर करतील असे या व्यापार्यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे साठ व्यापार्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अडून पडला होता. मासळी मार्केटची इमारत धोकादायक ठरल्याने या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सर्व व्यापार्यांना स्थलांतरासाठी फोंडा पालिकेने तगादा लावला होता. मात्र स्थलांतरास योग्य जागा मिळत नसल्याने व्यापार्यांनी विरोध केल्यामुळे हे स्थलांतर अडून पडले होते.
मध्यंतरीच्या काळात हा स्थलांतराचा प्रश्न स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गेल्यानंतर त्यावर तोडगा काढून 2 सप्टेंबरला स्थलांतराची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आता व्यापार्यांनी आज 2 तारखेपासून स्थलांतरास सुरुवात केली आहे. सध्या किरकोळ सामानाची विक्री करणार्या व्यापार्यांनी स्थलांतरास प्रारंभ केला असून कपडेवालेही जागा मिळाल्यानंतर स्थलांतर करतील, असे या व्यापार्यांनी सांगितले. दरम्यान, मासळी मार्केटची इमारत धोकादायक ठरल्यामुळे ही इमारत पाडून त्याजागी पालिका बाजार इमारत बांधण्याचे नियोजन फोंडा पालिकेने केले होते. या जुन्या इमारतीचे सिमेंटचे तुकडे पडत असल्याने धोका वाढला होता म्हणून व्यापार्यांनी त्वरित स्थलांतर करावे, असा तगादा पालिकेने व्यापार्यांना लावला होता.