गोवा

Goa accident news | लग्नाची खरेदी करून परतताना दाम्पत्यावर काळाचा घाला

चोर्ला घाटात कारवरील ताबा सुटून भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

धावे : गोव्याच्या सीमावर्ती भागातील चोर्ला घाटात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. बेळगाव येथे लग्नाच्या खरेदीसाठी गेलेले चौघेजण परत असताना ही घटना घडली. चालकाचा कारवरील ताबा सुटून वाहन खोल दरीत कोसळली. मृत दोघेही पती-पत्नी आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री (क्र. जीए-०७-३९७८) ही कार बेळगावहून गोव्याच्या दिशेने येत होती. चोर्ला घाटातील जांभळी जंक्शन परिसरात केरी - अंजुणे धरणाजवळील उतरणीवर चालकाचा अचानक ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातात मोहन रामदास वाघमोडे (वय ५८) आणि त्यांची पत्नी रेणुका मोहन वाघमोडे (४८), रा. व्हाडले भाट, मेरशी यांचा मृत्यू झाला. तर निवृत्ती विठ्ठल वाघमोडे (५७) आणि राणीबाई निवृत्ती वाघमोडे (४७, रा. वरचे हरवळे, साखळी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

जखमींना प्रथम १०८ रुग्णवाहिकेद्वारे साखळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोमेकॉत मृतांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अपघाताची नोंद वाळपई पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस हे पुढील तपास करत आहेत. चोर्ला घाटात वारंवार अपघातांच्या घटना घडत असतात. यावर्षी आतापर्यंत म्हणजेच तीन महिन्यांत चार भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT