पणजी : पुढारी वृत्तसेवा
मये मतदारसंघातील शेतीला योग्य प्रकारे पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाळवंटी नदी आणि डिचोली नदीतील गाळ उपसा करावा तसेच त्यांच्या किनाऱ्यांची बांधणी करावी, अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली.
प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार शेट यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला व मये मतदारसंघात ६५ लहान-मोठे प्रकल्प जलसिंचन खाते बांधत आहे. त्याचे काम कुठवर आले, असा प्रश्न विचारला. येथील शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांना उत्तर देताना जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की,
जलसिंचन खात्यातर्फे मये येथे २०२१-२२ मध्ये १२, २२-२३ मध्ये २२, २३-२४मध्ये २८, २४-२५ मध्ये १७व २५-२६ मध्ये ३४ असे एकूण ११३ प्रकल्प बांधत असल्याचे सांगून काही प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरीत प्रकल्पांचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
वाळवंटी व डिचोली नदीतील गाळ उपसा करण्यात येईल व कठडेही बांधले जातील, असे त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्यास जलसिंचन सज्ज
मयेतील जमिनीवर मिरची, भात, भाजी चांगल्या प्रकारे उत्पादन होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही उत्पादने घेण्यासाठी पुढे आणावे जलसिंचन खाते त्यांच्यासाठी पाण्याची योग्य ती सोय करण्यास तयार असल्याचे शिरोडकर यांनी आश्वासन दिले.