Illegal Mining Pudhari
गोवा

Mayem Mining Protest | मागण्या मान्य केल्याशिवाय खाण व्यवसाय नको

Mayem Mining Protest | मये पंचायत ग्रामसभेत सर्वांनुमते ठराव; पंचायत बजावणार कंपनीला नोटीस

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

मये पंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या साळगावकर खाण कंपनीने स्थानिकांना रोजगार, कंत्राटे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खाण व्यवसायाशी संबंधित आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात होत असलेल्या त्रुटी, शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आणि शेती व्यवस्थेचे झालेले नुकसान यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय खाण व्यवसाय सुरू करू नये, असा ठराव ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला. मये पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसभेला सरपंच विशांत पेडणेकर, पंचायत सदस्य, सचिव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी सांगितले की, खाण कंपन्यांनी स्थानिकांना रोजगार व इतर बाबींमध्ये सामावूनघेण्यास टाळाटाळ होत असते तसेच प्रक्षण, शेतीचे नुकसान व विविध प्रकारचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणताही खाण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी गावाच्या हिताचा निर्णय घेणे कंपनीसाठी बंधनकारक असल्याचे विजय पोळे यांनी नमूद केले.

प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच सखाराम पेडणेकर यांनी सांगितले की, खाण कंपन्या केवळ आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती करत नाहीत. परिणामी शेतकरी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असून शेती व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

या प्रश्नांबाबत यापूर्वीही जागृती करण्यात आली होती, मात्र कंपन्या न्यायालयात जाऊन वर्षानुवर्षे खटले लढवत राहतात आणि जनहिताकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जोपर्यंत शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, तोपर्यंत खाण कंपन्यांना कोणत्याही प्रकारचा खाण व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देऊ नये, असा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सरपंच विशांत पेडणेकर यांनी सांगितले की, साळगावकर कंपनीने खाण व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी पंचायतीतर्फे संबंधित खाण कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ग्रामसभेत खाण व्यवस्थापनाकडून आवश्यक परवाने व इतर नियमांचे पालन केले जात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. स्थानिकांना सातत्याने डावलून बाहेरील लोकांना रोजगार व कंत्राटे दिली जात असल्याने आधी स्थानिकांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

आज खाणीवर धडक

या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजता कंपनीवर धडक देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ तसेच खाण पीडित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT