पणजी; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने अडकलेली मये येथील विद्यार्थिनी रूपल गोसावी मंगळवारी सुखरूप गोव्यात पोहोचली. ती तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तेथील तणावामुळे तिने 27 फेब्रुवारीला परतण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. मात्र, त्याआधीच तेथे युद्ध सुरू झाले आणि ती अडकून पडली.
रूपल ही तीन भावडांपैकी सर्वांत मोठी. तिला अकरावी आणि नववीत शिकणार्या दोन बहिणी आहेत. तिची आई रश्मी गोसावी या माहिती व प्रसिद्धी खात्यात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, महिनाभर युक्रेनमध्ये अशांतता आहे. त्यामुळे रूपलचे गोव्याला येण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी तिच्या महाविद्यालयाची परवानगी, प्रवासाची कागदपत्रे यासाठी वेळ लागला.
युक्रेनच्या टुरोपिल भागात ती शिकत होती. तुलनेने तो भाग सध्या शांत आहे. त्यामुळे आम्ही थोडे निर्धास्त होतो. मात्र, मनामध्ये धास्ती होती. केंद्र सरकार वकिलातीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. रूपलने हे आम्हाला सांगितले होते. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. केंद्र सरकारनेच आता तिच्या येण्याची व्यवस्था केली. मंगळवारी ती दिल्लीत पोहोचल्याचे समजले आणि आमच्या मनावरील दडपण दूर झाल्याचे तिच्या आईने सांगितले. तिच्या स्वागतासाठी कुटुंबीय रात्री 9.30 वाजता दाबोळी विमानतळावर पोहोचले होते. ( रूपल गोसावी सुखरूप गोव्यात )
भाजपने युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीयांच्या मदतीसाठी मदत क्रमांक मंगळवारी जारी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीयांना आणण्यासाठी भाजप समन्वयाची भूमिका बजावत आहे. गोमंतकीयांना मदत हवी असल्यास त्यांनी 8275037533 या क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचलंत का?