Vasco Fire Accident 
गोवा

Vasco Fire Accident | वास्कोत भीषण अग्नितांडव; मध्यरात्री लागलेल्या आगीत 200 दुकाने जळून खाक, 20 कोटींचे नुकसान

 Vasco Fire Accident | 20 कोटींचे नुकसान : बाधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथे बुधवारी (दि. २८) रात्री तीन ठिकाणी लागलेल्या आगीत २०० दुकाने खाक झाली. यात २० कोटी रुपयांचे नुकसान झाले. नवेवाडे येथील घर, वास्को टिळक मैदान कॉम्प्लेक्समधील दुकान आणि मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटमध्ये या आग लागल्या. त्यापैकी मॉडर्न मार्केटमधील आग सर्वाधिक भीषण होती. या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटमधील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत करण्यासाठी आमदार कृष्णा साळकर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन देण्याची घोषणा केली.
बुधवारी रात्री १०.१० वाजता नवेवाडे येथील रिबेलो यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणल्यानंतर रात्री १०.२५ वाजता वास्कोतील टिळक मैदान कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला आग लागली.

या दुकानात वाहनांची सीट कव्हर आणि इतर साहित्य होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्थानिकांना ती नियंत्रणात आणता आली नाही. घटनास्थलळी आमदार कृष्णा साळकर आणि माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा दाखल झाले.

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र,काळातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दुकानमालक फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या मालकीच्या कारसह इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर वास्कोच्या मध्यवर्ती भागातील मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटच्या पहिल्या मजल्यावर आग लागली.

आगीने वेगाने रौद्ररूप धारण केल्याने परिस्थिती गंभीर बनली. गुरुवारी सकाळपर्यंत अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची १४ वाहने पाचारण केली. गुरुवारी (दि. २९) दुपारी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मुख्यमंत्रीकडून मदतीचे आश्वासन

आग लागल्याचे कळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रात्री १२ नंतर घटनास्थलळी आले. त्यावेळी आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते. नुकसानग्रस्त दुकानदारांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असून, एकाही दुकानदाराला सरकारी मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

नुकसानग्रस्तांच्या मालमत्तेचा अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अद्या क्लिलेट्स यांना दिले. यावेळी आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर आणि भाजपाचे राज्य सचिव दीपक नाईक उपस्थित होते. वास्को अग्निशमन दल, गोवा शिपयार्ड, मुरगाव पतन प्राधिकरण, नौदल, तटक्षक दल तसेच वेर्णा, फोंडा, कुडचडे आणि पणजी येथून अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुरगाव पालिका सभागृहात वास्को येथील मॉडर्न मार्केटमधील आगीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी बाधित व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. बैठकीला आमदार कृष्णा साळकर आणि संकल्प आमोणकर,

मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, जिल्हाधिकारी एसा क्लिटस, वरिष्ठ पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, पालिका अधिकारी आणि बाजार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगीची सद्यस्थिती, नुकसानीचे प्रमाण, भविष्यातील अग्निसुरक्षेच्या उपाययोजना, विविध विभागांतील समन्वय आणि आगीमुळे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना मदत करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

राज्य आपत्ती म्हणून घोषित करा : खा. फर्नांडिस

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी गुरुवारी सकाळी मॉडर्न मार्केटची पाहणी केली. नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मॉडर्न मार्केटमधील आगीची घटना 'राज्य आपत्ती' म्हणून घोषित करावी आणि आगीच्या कारणांची चौकशी करावी,

अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, तुळशीदास फळदेसाई, नियाजी शेख आणि गोवा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे संयोजक नजीर खान उपस्थित होते.

युरी आलेमाव यांचा सरकारवर आरोप

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी घटनास्थळाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कलम १६३ अंतर्गत त्यांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावरून आलेमाव यांनी उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्यग्र असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आलेमाव यांनी केला.

मार्केटमधील एकही 'फायर हायड्रंट' कार्यरत नसल्याचा दावा करून आगीमागे घातपात आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेत्यालाच घटनास्थळी जाण्यास मज्जाव केल्याबद्दल त्यांनी सरकारचा निषेध केला. नुकसानग्रस्त दुकानदारांना दिवाळीपूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी आणि त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT