Canva Image
गोवा

Goa fire news | सॉ मिलला आग; ५० लाखांचे नुकसान

दवर्लीतील घटना; यंत्रसामग्रीसह लाकडाचा साठा जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : दवर्ली येथील श्री गौलक्ष्मी सॉ मिलमध्ये शुक्रवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत सॉ मिलमधील महागडी यंत्रसामग्री तसेच लाकडाचा मोठा साठा पूर्णपणे जळून खाक झाला.

मागील काही महिन्यांत वास्को येथील औद्योगिक शेड, मडगावमधील व्यापारी संकुल, फोंड्यातील गोदाम तसेच वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यातच आता दवर्लीतील ही घटना भर घालत असून, औद्योगिक आगीमुळे गोव्याची सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आग लागल्याची माहिती पहाटे पावणेतीनच्या सुमारास अग्निशामक दलाला मिळताच मडगाव अग्निशामक दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आग वेगाने पसरल्याने वेर्णा, कुंकळ्ळी, कुडचडे, फोंडा आणि पणजी येथून अतिरिक्त अग्निशामक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. सहा केंद्रांतील गाड्यांनी सुमारे ८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

जीवितहानी टळली

अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी सांगितले की, सॉ मिलच्या एका भागात मोठ्या प्रमाणात लाकूड व यंत्रसामग्री साठवण्यात आली होती. मोल्डिंग व बीम तयार करण्याचे काम येथे चालते. रात्री सॉ मिल बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

...अन्यथा आणखी मोठी हानी झाली असती

ज्या शेडमध्ये आग लागली त्या ठिकाणालगतच कामगारांची घरे आहेत. जर ही आग दिवसा किंवा काम सुरू असताना लागली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती, असा इशाराही स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT