Goa Margao municipal file photo
गोवा

Margao | मडगावातील 'नंदी' ग्राम

Margao | मडगावातील 'नंदी' ग्राम

पुढारी वृत्तसेवा

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या कितीही गप्पा मारल्या तरी धरणांना 'कट' मारून कालवे कसे वळवायचे, हे सरकारी कर्मचाऱ्यांना सांगायला नको. मडगाव पालिकेत असेच एक पावन 'नंदी' ग्राम स्थापन झाल्याची बोलवा आहे. नंदीला 'चढावा' दिल्याशिवाय म्हणे इथे कामेच होत नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा आरटीओ कार्यालयातील जादू की झप्पी अनेकांनी अनुभवलेली आहे. पण, इथे बाहेरचे प्राणी शेतीत घुसायचे. इथे मात्र कुंपणच शेत खात आहे. सरकारने यात लक्ष घालावे.

गावची व्हकल कॉर्ड परफेक्ट

सावर्डेत गुरुवारी झालेल्या संकेत आर्सेकरच्या वाढदिवसाचा हँग ओव्हर अजून उतरलेला नाही. कार्यक्रमाचा कौतुक सोहळा सोशल मीडियावर सुरूच आहे. अवयवदानासारखा उपक्रम राबवून संकेतने एक चांगले काम केले आहे. या कार्यक्रमात हास्य कलाकार आणि कलाकार मनोहर भिंगी यांनीही चार चांद लावले. ते म्हणाले कोणकोणते अवयव दान करता येतात माहीत नाही, पण माझे वोकलकॉर्ड कोणाला बसवता येत असतील, तर जरूर बसवा. काढू दे कोणाला किती आवाज काढायचे ते.

राजकारणातील बँड मोडीत

एकेकाळी महाराष्ट्रात शिवसेनेचा दबदबा होता. ते सत्तेत नसले तरी धाक असायचा. आज कुणीही उठून पक्षाला डोळे वटारतो. छगन भुजबळ फुटले तेव्हा त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात येणे कठीण व्हायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही तीच अवस्था आहे. शरद पवार म्हणतील ते ब्रह्मवाक्य असलेल्या या पक्षातही फूट पडली आहे. सध्या तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके त्याच वाटेने जात आहे. गोव्यात काँग्रेसची तीच अवस्था होणार आहे का ? राजकारणातील बँड मोडीत निघत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.

हा कसला इफेक्ट ?

संकेत आर्सेकरचे सोवळ्यातले, पूजा करतानाचे फोटो लक्षवेधी होते. ते तरी भाजपातच आहेत. राष्ट्रीय स्तरावरही अनेक नेते हिंदू असल्याचे प्रदर्शन करत असतात. गोव्यात इतर पक्षातून भाजपात आलेले नेतेही पूजा, अनुष्टानांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीपासून अयोध्येपर्यंत माथ्यावर आडवे पट्टे काढून तसे फोटो देतात. काही वर्षांपूर्वी कोणताही राजकीय नेता आपण हिंदू असल्याचा असा शो करील, हे स्वप्नात तरी खरे वाटले असते का? अनुष्ठाने सोडा आपण घरी पूजा करतो हे सांगणे ही मागासलेपणाचे लक्षण समजले जाई. मात्र, आज राज्यात आणि देशातही विरोधी पक्षांतील नेतेही असे फोटो व्हिडिओ अभिमानाने मिरवू लागले आहेत? हा कसला आणि कोणाचा इफेक्ट आहे?

टोनी यांचा गौरव

पणजी महापालिकेचे माजी महापौर टोनी रॉड्रिगीस हे खरे गाजले ते पोलिस स्थानकावर हल्ला झाला त्यावेळी. पणजीचे विद्यमान आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक असलेले टोनी त्यावेळी पणजीचे महापौर होते. मोन्सेरात यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चावेळी पोलीस स्थानकावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पोलिसांनी टोनी यांना बरेच बदडले होते. त्यानंतर त्यांनी मोन्सेरात यांची साथ सोडली. २०२२ मध्ये जेनिफर मोन्सेरात यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढवली. आता पुन्हा ते मोन्सेरात यांच्या बाजूने झालेत. टोनी यांचा शुक्रवारी पणजीत सत्कार झाला. निवडणूक जवळ आल्याने त्यांच्याच समर्थकांनी हा सत्कार केल्याची चर्चा असून टोनी पुन्हा निवडणुकीत उतरतात का ते पाहावे लागेल.

पिण्याच्या पाण्यात किडे

सत्तरी तालुक्यात एका गावात दोनवेळा नळातून येणाऱ्या पाण्यात किडे सापडले. मानवाधिकार आयोगाने त्याची दखल घेऊन अहवाल मागितला आहे. सत्तरी तालुक्यातच हे घडले म्हणून ठीक आहे. कारण सत्तरी तालुक्यात आंदोलने वगैरे जास्त उभी राहत नाहीत. मात्र, इतर तालुक्यांमध्ये असा प्रकार घडला असता, तर एव्हाना आंदोलने उभी राहिली असती आणि आंदोलकांनी पणजी दणाणून सोडली असती. विरोधी पक्षाचे नेतेही या प्रकरणी गप्प आहेत, याचे आश्चर्य वाटते.

59 व्या वर्षी नोकरी

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देण्याचे काम पूर्वीच्या सरकारने जलदगतीने करणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही आणि त्यांचे वय वाढत गेले. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळातच मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. काहींना वयाच्या 59 व्या वर्षी नोकऱ्या मिळाल्या. मात्र, त्यांना नोकरी फक्त काही महिनेच करण्याची संधी मिळत आहे. कारण 60 व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने नोकऱ्या देण्यात चालढकल केल्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना हा त्रास झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बोरकरांची घोषणा कितपत सत्य

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख व अध्यक्ष मनोज परब यांनी पक्षाला रामराम ठोकून संन्यास घेतल्यापासून या पक्षाची वाताहात झाली आहे. या पक्षाला तारण्यासाठी उरलेल्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या पक्षाची स्थिती सध्या शिड नसलेल्या जहाजासारखी झाली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी पुढील निवडणूक या पक्षातून लढवण्याची घोषणा केली असली तरी ती सध्या लोकांकडून टीका होईल या उद्देशाने केली आहे. अशा घोषणा निवडणूक तोंडावर आल्यावर बदलल्या जातात हे सत्य आहे. मात्र, जशी निवडणूक जवळ येईल तेव्हा ते बुडणाऱ्या या पक्षातून कधी उडी मारतील हे लवकरच कळेल. त्यांना पक्ष टिकवायचा नसेल असेच त्यांच्या सध्या पक्षाबद्दल असलेल्या आदरावरून दिसून येत आहे. एकहाती लढा देण्याची ही वृत्ती असली तरी किती कार्यकर्ते पाठीशी आहेत याचाही अभ्यास करायला हवा. लोकांचा या पक्षाबाबत असलेला विश्वास व आदर ढळला आहे तो पुन्हा मिळवण्यास पुढील दिवस पुरेसे नाहीत.

पोलिस कारवाई नाममात्र

पोलिस खात्यातील बेशिस्त पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिले. कारवाई केली जाते मात्र मागील दाराने या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत चौकशीत दोषी आढळून आल्यावर त्यांना घरचा रस्ता दाखवण्याऐवजी मागील दाराने पुन्हा सेवेत घेतले जाते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई ही नाममात्र असते हे पोलिस कर्मचाऱ्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे ही कारवाई पोलिस कर्मचारी गंभीर घेत नाहीत. खात्यात आलेले हे पोलिस कर्मचारी कोणाच्या तरी राजकीय आशीर्वादाने आलेले असतात. हीच परिस्थिती सध्या इतर खात्यांमध्येही आहे.

हे कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाबरत नाहीत. उलट या अधिकाऱ्यांचीच उचलबांगडी करण्याइतपत त्यांची मजल जाते. यापूर्वीही राज्यात आलेल्या आयपीएस पोलिस महासंचालकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जमले नाही ते महासंचालक अलोक कुमार करून दाखवणार का ?

तवडकरांची भ्रमंती

अलीकडे आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर बरेच सक्रिय झाले आहेत. आदिवासींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळात ते होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता तर ते राज्यातही सक्रिय झाले आहेत. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांना शुभेच्छा द्यायला ते दाखल झाले तसेच कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनाही त्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. सावातील 'संकेत' समजला, तवडकरांचे 'संकेत' काय आहेत याचीच राज्यात चर्चा सुरू आहे.

रॉय नाईक यांचे फलक

रवी नाईक यांच्या निधनानंतर फौंडा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्याची निवडणूक आता २०२७ मध्येच होणार आहे. रवी यांच्या निधनानंतर रवी पुत्राच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी आता फोंड्यात लक्ष घालायला प्रारंभकेला आहे. त्यांचे चाहते आणि पाठीराखे मतदार संघात आहेत. त्यांनी फोंड्यात लक्ष घातल्याने आता रवींचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांनी मडकईत लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर सर्वत्र लागले आहेत. मडकईत सुदिन यांचा पराभव करणे जवळपास अशक्य आहे. पण राजकारणात अशा तिरक्या चाली खेळाव्या लागतात. १९९४ साली मगोला गाफील ठेवून भाजपने युती तोडली होती तो अनुभव गाठीशी असल्याने सुदिनही दक्ष आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT