Mahesh Kale Abhangwani Marcel Goa 
गोवा

Mahesh Kale Abhangwani Marcel Goa | "माशेलचा जगप्रसिद्ध चिखलकाला 24 जुलैपासून!; प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या 'अभंगवारी'ची नांदी"

Mahesh Kale Abhangwani Marcel Goa | मंत्री रोहन खंवटे : महेश काळे यांच्या गायनाची पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने सांस्कृतिक सणाचा दर्जा देऊन पर्यटन कॅलेंडरमध्ये समाविष्ट केलेला माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला उत्सव २४ ते २६ जुलैदरम्यान श्री देवकी कृष्ण मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.

या तीनदिवसीय उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या 'अभंगवारी'चा कार्यक्रम असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. राज्याच्या पारंपरिक संस्कृतीशी निगडित सण-उत्सवांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या परंपरांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने पर्यटन खात्याने चिखल काल्याला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. पर्यटकांसाठी 'मॉन्सून मॅजिक ऑफ गोवा' या संकल्पनेवर आधारित विशेष छायाचित्रण आणि रिल्स निर्मिती स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

उत्सवाचे औपचारिक उद्घाटन २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यापूर्वी दुपारी पारंपरिक पाककला स्पर्धा आणि 'अनुभूती' हा सांगीतिक कार्यक्रम होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता महेश काळे आपल्या सुश्राव्य गायनातून 'अभंगवारी' सादर करणार आहेत.

२५ जुलै रोजी श्री देवकी कृष्ण मंदिरात दिवसभर पारंपरिक भजनांचा कार्यक्रम होणार असून, २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पारंपरिक चिखल काला खेळ रंगणार आहे. या खेळात अबालवृद्ध सहभागी होऊन भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांना उजाळा देतील. जोरदार पावसात साजरा केला जाणारा माशेलचा चिखल काला हा भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित पारंपरिक उत्सव आहे.

या उत्सवात भाविक, पर्यटक आणि विविध स्तरांतील नागरिक सर्व भेदभाव विसरून चिखलात खेळतात. शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा आज गोव्याच्या प्रमुख सांस्कृतिक आकर्षणांपैकी एक बनली असून, देशभरातील छायाचित्रकार, पर्यटक आणि संस्कृतीप्रेमी या अनोख्या सोहळ्यासाठी माशेलमध्ये दाखल होतात, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT