फोंडा : पुढारी वृत्तसेवा
मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी सरकारने राजभाषा कायद्यात दुरुस्ती करावी आणि कोकणी सोबत मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, असा एकमुखी ठराव फर्मागुढी-फोंड्यात रविवारी झालेल्या मराठीच्या मातृशक्ती मेळाव्यात घेण्यात आला.
खचाखच भरलेल्या गोपाळ गणपती सभागृहात उपस्थित मराठीप्रेमींनी हा ठराव घेतला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या मेळाव्यात मराठीप्रेमींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मातृशक्ती मेळाव्याचे उद्घाटन साहित्यिक दीपा जयंत मिरिंगकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्यिक लक्ष्मी जोग, मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, शाणूदास सावंत, दिवाकर शिंक्रे, मातृशक्तीच्या प्रमुख डॉ. अनिता तिळवे, अॅड. रोशन सामंत आदी उपस्थित होते.
अॅड. रोशन सामंत म्हणाल्या, मराठी ही सर्व भाषांची आई आहे. कला आणि संस्कृती रक्षणासाठी मराठीने दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही. भाषेचा प्रभावी वापर झाला तर ती भाषा फुलून येते.
मराठीने जनसामान्यांसाठी आदराचे स्थान दिले आहे. गोव्यात सर्वाधिक वापर हा मराठी भाषेचा होतो म्हणून मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी असे आवाहन सामंत यांनी करताना गोव्यातून मराठीला राजभाषा करण्यासाठी पाच लाख सह्यांचे निवेदन आदरणीय राष्ट्रपतींना पाठवूया हे आपले घरचेच काम आहे या भावनेतून कार्य करून सह्यांची जोरदार मोहीम राबवून राष्ट्रपतींना साकडे घालूया, असे आवाहनहु त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अनिता तिळवे यांनी केले.
महिलांची उपस्थिती लक्षणीय !
या मातृशक्ती मेळाव्यात भाषणांना आटोपते ठेवत महिलांचा मराठीविषयी मार्गदर्शन करणारा उत्कृष्ट कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात भजन, मुलांचे कार्यक्रम प्रबोधन व योगा आदी विविधांगी कार्यक्रम झाले. या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.