डिचोली : मराठी भाषेने आजवर खूप अन्याय सहन केला आहे. मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णायक लढाईची वेळ आली आहे. राज्यात 80 टक्के मराठी भाषिक असूनही मराठीला न्याय मिळत नाही. त्यामुळे मराठी राजभाषेच्या मागणीला पाठिंबा देणार्यालाच मत देण्याचा निर्धार करण्याची वेळ आलेली आहे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी डिचोली येथील मराठी निर्धार मेळाव्यात केले.
मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे डिचोलीतील तारी सभागृहात प्रखंड मेळावा आयोजित केला होता. ते म्हणाले, मराठी भाषेच्या शाळा बंद करण्याच कारस्थान सुरु आहे. मराठी शाळा चिरडून काढल्या जात आहेत. नवीन पिढीला अन्यायाचा इतिहास माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पंचायत स्तरावर समिती स्थापना करणार असून जुन्या-नव्यांना सोबत घेऊन ही चळवळ पुढे नेणार आहोत.
यावेळी डिचोली तालुक्याची समिती जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष बाबुसो सावंत, उपाध्यक्ष अरविंद सायणेकर, समन्वयक मुकुंद कवठणकर, सचिव ओंकार केळकर, कोषाध्यक्ष नितीन मळगावकर आदींचा समावेश आहे.
मराठी रक्षणासाठीची चळवळ केवळ युवा पिढीला तरण्यासाठी आहे. उत्तम समाज घडवण्यासाठी मराठीचा सर्वस्तरांत वापर करताना युवा पिढीने ती उचलून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. गोव्यातील अनेक रत्नांनी गोव्याला जागतिक पातळीवर नेले. ते सगळे मराठीच होते व आहेत, असे प्रतिपादन गो. रा. ढवळीकर यांनी सांगितले. युवा शक्तीचा भरणा असलेल्या या मेळाव्यास यावेळी मुकुंद कवठणकर, शाणुदास सावंत, बाबुसो सावंत, सुबोध मोने, सायली गर्दे आदी उपस्थित होते.