म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
पणजीतील एका महिला नगरसेविकेविषयी तसेच भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी सुदीप दळवी यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
पणजी येथे अलीकडे झालेल्या 'जेन झी' आंदोलनादरम्यान आंदोलक अमरीन शेख यांना ताब्यात घेताना पोलिसांनी त्यांचे कपड़े फाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले होते.
त्यावेळी तक्रारदार महिलेने दिलेल्या उत्तराच्या व्हिडिओचा संदर्भ घेत दळवी यांनी आपल्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे.
या पोस्टमुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत संबंधित महिलेने म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारीही तिच्यासोबत उपस्थित होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दळवी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.