Mapusa Market 
गोवा

Mapusa Market | म्हापसात अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mapusa Market | प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
वास्को बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने जळून खाक होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर म्हापसा बाजारपेठेतील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तर गोव्यातील गजबजलेल्या बाजारपेठेत दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्थानिक रहिवासी आत्माराम गडेकर यांनी म्हापसा बाजारपेठेतील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. अग्निभन उपकरणे सुस्थितीत ठेवणे, बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवणे, आणीबाणीचे दिशादर्शक फलक लावणे आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अरुंद मार्ग आणि धोकादायक वीजताऱ्यांमुळे आगीचा धोका वाढत असल्याचे सांगत त्यांनी नगरपालिका आणि अग्निशमन दलामारफत संयुक्त अग्निसुरक्षा तपासणी करण्याची विनंती केली. व्यापारी, खरेदीदार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांच्या पूर्वतयारीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुर्घटना घडल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, असा इशारा गडेकर यांनी दिला. जीवितहानी आणि उपजीविकेचे नुकसान झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन हायड्रंट्स पाण्याचा दाब नसल्याने निष्क्रिय

ऐतिहासिक म्हापसा बाजारपेठ प्रशासकीय दुर्लक्ष, अनियंत्रित पदपथ विक्रेते आणि बेशिसत पार्किंगमुळे अग्निसुरक्षेच्या धोक्याला सामोरी जात आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांना बाजारपेठेत प्रवेश करणे कठीण झाले आहे.

२०१० मधील आगीनंतर बसवलेले अग्निशमन हायड्रंट्स आवश्यक पाण्याचा दाब नसल्याने निष्क्रिय आहेत. नगरपालिका आणि व्यापारी संघटनांनी गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमणे हटवावीत आणि हायड्रंट्स कार्यान्वित करावेत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT