पणजी (पुढारी वृत्तसेवा):
म्हापसा येथील पडीक इमारतीत एका लहान मुलाविर कथित लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित इमारत सील करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी म्हापसा पोलिसांनी म्हापसा नगरपालिका प्रशासनाशी औपचारिक संपर्क साधला आहे.
म्हापसा पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीची मालकी तसेच तिची कायदेशीर स्थिती याबाबतचा तपशील मिळवण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याची विनंती करत म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी कौशिक देसाई यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, असुरक्षित किंवा पडीक इमारती सील करण्याच्या प्रक्रियेत काही कायदेशीर अडचणी असल्याचे मुख्याधिकारी कौशिक देसाई यांनी स्पष्ट केले. विशेषतः इमारतीच्या मालकीवरून मालक आणि भाडेकरूंमध्ये परस्परविरोधी दावे असल्यास कारवाई करताना कायदेशीर बाबींचा विचार करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. संबंधित 'डेम्पो म्ेंशन' इमारतीबाबत या घटनेपूर्वीच नगरपालिकेकडे कार्यवाही सुरू होती आणि त्यावर सुनावणीही घेण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी दिली.