म्हापसा : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढू लागली आहे. उत्तर गोव्यातील महत्त्वाचा मानला जाणारा म्हापसा भाजप मतदारसंघही याला अपवाद नाही. आणि काँग्रेसबरोबरच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (मगो) देखील उमेदवारीसाठी अनेक इच्छुक सक्रिय झाले असून, मतदारांच्या गाठीभेटी, बैठका आणि जनसंपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. म्हापसा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा हे भाजपचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी मतदारसंघातील विकासकामांच्या गतीवरून त्यांच्यावर विरोधकांसह पक्षांतर्गतही टीका होत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मतदारसंघातील विकासाच्या मुद्यावर विविध राजकीय पक्षांतील काही नेत्यांनी 'म्हापसा फॉर टुगेदर' या व्यासपीठाची स्थापना केली असली, तरी ही आघाडी निवडणुकीपर्यंत कायम राहील का, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे.
निवृत्त सरकारी अधिकारी मयूर सावकार यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. म्हापसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनोद फडके यांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचा दावा नुकताच केला आहे.
याशिवाय माजी नगरसेवक राजसिंग राणे, माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, संदीप फळारी, रायन ब्रागांझा तसेच म्हापसा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते रुपेश कामत हेही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये वरवर शांतता दिसत असली, तरी अंतर्गत स्पर्धा आणि धुसफूस वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार राहिलेले माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर पुन्हा एकदा इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबरच काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते विजय भिके यांनीही पुन्हा उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. गोवा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप आणि म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर हेही इच्छुक असल्याचे समजते. आगामी काळात आणखी काही नेते इच्छुकांच्या यादीत सहभागी होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातही म्हापसा मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याची चर्चा आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच मतदारसंघात पुन्हा प्रभाव निर्माण करण्यासाठी मगोकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, संभाव्य उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
इच्छुकांनी वाढविला जनसंपर्क...
एकूणच, विधानसभा शशांक नार्वेकर निवडणुकीला अद्याप अवधी असला तरी म्हापसा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांतील इच्छुकांनी जनसंपर्क वाढविला असून विकास, रोजगार, पायाभूत सुविधा आणि नागरी प्रश्न हे प्रमुख मुद्दे ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असली, तरी अखेर पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.