पणजी : म्हापसा येथील मार्केटमधील एका इमारतीच्या निर्जनस्थळी चार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ माजवलेल्या प्रकरणातील नराधम पुंडलिक करिप्पा गुडगे (२८ वर्षे, धारवाड - कर्नाटक) याला ३६ तासांच्या शोधकार्यानंतर पणजीत जेरबंद करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त होत असताना संशयिताला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी लोकांकडून होत होती. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केल्याने पोलीस खात्याला या प्रकरणातील कोणतेच धागेदोरे व पुरावे नसताना छडा लावण्याचे मोठे आव्हान होते.
त्यासाठी सुमारे ४० पोलिसांची फौज शोधकार्यासाठी तैनात केली होती. म्हापसा परिसरातील सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, मानवी गुप्तवार्ता आणि तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलिसांनी या 'ब्लाइंड केस'चा छडा लावला.
म्हापसा पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी अधीक्षक तथा म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी आशीष शिरोडकर व अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनखाली संशयित नराधमाला गजाआड करण्यात यश मिळवले. कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी दिवसरात्र संशयितची माहिती मिळवण्यासाठी केलेल्या कार्याची पोलीस पथकाचे म्हापसा नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.
मोटारसायकल पायलट ठरणार मुख्य साक्षीदार
पीडित बालिकेच्या वडिलांनी म्हापसा मार्केटमध्ये आपल्या नातेवाईकांकडे तिला ठेवून दारू आणण्यास गेले होते. उशीर झाला म्हणून ही पीडित मुलगी वाट पाहत रडत होती. त्याचवेळी संशयित तिथे आला व मुलीला वडिलांकडे घेऊन जातो असे सांगून तिला म्हापसा मार्केटमधील एका जीर्ण इमारतीच्या मागील निर्जनस्थळी घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
रडत असलेल्या या बालिकेला घेऊन जाताना येथील मोटारसायकल पायलटने पाहिले होते. मात्र ती बालिका हट्टापायी रडत असावी, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्याकडे त्याने लक्ष दिले नव्हते. त्यामुळे या मोटारसायकल पायलट मुख्य साक्षीदार ठरणार आहे.
एक तीन वर्षांची मुलगी रडत असलेली व तिच्या अंगावरील कपड्यांवरील रक्ताचे डाग पाहून तेथील काही नागरिकांनी ही घटना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी म्हापसा पोलिसांना दिली. प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि पूर्णपणे 'ब्लाइंड केस' असल्याने पोलिसांसमोर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची ओळख निश्चित करण्याचे आव्हान होते. तपासदरम्यान पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यानंतर मुलगी वडिलांपासून कशी दूर गेली आणि त्यापूर्वीच्या घटनाक्रमाची माहिती घेणारी आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
तपासात म्हापसा टॅक्सी स्टँडजवळ मुलीचे वडील आणि त्यांचे परिचित व्यक्तींमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींची पोलिसांनी पडताळणी केली. त्याचवेळी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले.
या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असला तरी नराधमाने या बालिकेचा गैरफायदा उठवत हे कृत्य दारूच्या नशेत केल्याचे समोर आले आहे. या फुटेजमध्ये पीडित मुलगी आणि एक पुरुष घटनास्थळाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. तो इतर व्यक्तींप्रमाणे म्हापसा बसस्थानक परिसर आढळून न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. म्हापसा पोलिस, जिल्हा पोलिस आणि क्राइम ब्रांचच्या पथकांनी गेल्या सुमारे ३६ तासांपासून राज्यातील विविध बाजारपेठा, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर संशयिताचा शोध घेतला.
अखेर संशयित पणजीत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्याचा शोध घेत ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात भक्कम आरोपपत्र दाखल करून खटल्याची जल्द सुनावणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
या तपासात म्हापसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत गावकर, निरीक्षक संजीत कांदोलकर, निरीक्षक महेश गाडेकर, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, उपनिरीक्षक बाबलो परब, उपनिरीक्षक अजय धुरी, उपनिरीक्षक विराज कोरगावकर, उपनिरीक्षक मंगेश पालन, निरीक्षक मंदार परब (हणजूण), महिला उपनिरीक्षक रविना सावतोडकर, उपनिरीक्षक माधव नाईक तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.