म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे केंद्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या नुकत्याच झालेल्या गोवा दौऱ्यानंतर म्हापसा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. विद्यमान आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या उमेदवारीबाबत पक्षात फेरविचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मात्र, याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जोशुआ डिसोझा यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी विजय मिळविला. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा विजयी झाले. त्या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली होती.
दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते मयूर सावकार यांनीही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. क्रीडा स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्क मोहिमांच्या माध्यमातून ते मतदारसंघात सक्रिय असून नागरिकांशी संपर्क वाढविण्यावर भर देत आहेत. अलीकडेच त्यांनी छत्र्यांचे वाटपही केले आहे.
दुसरीकडे, जोशुआ डिसोझा परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मतदारसंघात विविध उपक्रम राबवित आहेत. शालेय विद्यार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यासह विविध विकासकामांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडूनही म्हापसा मतदारसंघात पर्याय उभा करण्याचे प्रयत्न सुरू असून 'म्हापसेकरांचो एकवोट' या संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला जात आहे. म्हापसा मतदारसंघातील विविध समाजघटकांची मते आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.