पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्ष फोडण्यासाठी तीन कोटींचे डील (सौदा) केल्याचा दावा आरजी पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून केल्यामुळे तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
परब यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकल्या आहेत. एका पोस्टात त्यांनी आरजी पक्ष फोडण्यासाठी तीन कोटी रुपयांचे डील करण्यात आल्याचा दावा केला तर अन्य एका पोस्टमध्ये जरा थांबा... टाईम विल रोअर (वेळ गर्जना करेल), तसेच ज्याने आपले आमदार दोनदा भाजपला विकले, तो आता आरजीपीला वाचवणार... काय थट्टा आहे ही.
फक्त काही महिनेच, असेही एका पोस्टमध्ये म्हटले आहे. यावरून परब यांचा रोख काँग्रेसवर असल्याचे दिसते. व्यवस्थेवर प्रश्न विचारण्यासाठी आणि इतरांनाही तसे करण्यास तयार करण्यासाठी मी धाडस केले. मी केवळ गोवा वाचवण्यासाठी बोलण्याचे आणि त्यांच्या हक्कांची मागणी करण्याचे धाडस केले. मी लोकशाहीचा ग्रामोत्सव साजरा करण्याचे आणि महत्त्व निर्माण करण्याचे धाडस केले.
वरील गोष्टी करण्याचे धाडस कधीही न केलेल्या अनेकांकडून एका राजकारण्याला क्रांतिकारक म्हणून स्वीकारण्यात आले, असेही एका पोस्टात परब म्हणतात. मनोज परब यांनी बुधवारी पहाटे केलेल्या एकापाठोपाठ एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.
त्यांनी आजच्या आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखालील आरजीपीची तुलना स्वतःच्या विचारधारेशी केली. मनोज परब यांनी कोणी तीन कोटींचे डील केले, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आरजी फोडण्यासाठी तीन कोटींचे डील खरोखरच झालेय की हा फक्त दावा आहे, हे कळालेले नाही.