Bridge Pudhari
गोवा

Mandavi Bridge | मांडवी पुलांची होणार तांत्रिक तपासणी; 10 मे रोजी सकाळी 'या' वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद

Mandavi Bridge | जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राजधानी पणजीला जोडणाऱ्या मांडवी नदीवरील जुन्या आणि नव्या पुलांची नियमित तांत्रिक तपासणी आणि "डेक लेव्हल"ची नोंद करण्यासाठी रविवार, दि.१० मे रोजी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून या दोन्ही पुलांवरून ठराविक वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने ही तांत्रिक पाहणी केली जाणार असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अधिसूचनेनुसार, रविवारी सकाळी ६ ते ७:३० या वेळेत नवा मांडवी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत हलक्या वाहनांना जुन्या मांडवी पुलावरून दोन्ही बाजूंनी जाण्याची परवानगी असेल, मात्र जड वाहनांना अटल सेतूवरून (तिसरा मांडवी पूल) वळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच, सकाळी ७:३० ते ९ या वेळेत जुना मांडवी पूल तांत्रिक तपासणीसाठी बंद केला जाईल.

या दीड तासाच्या कालावधीत सर्व हलकी आणि जड वाहने नवा मांडवी पूल किंवा अटल सेतूचा वापर करू शकतील. पुलांची तपासणी आणि मोजणीचे काम अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT