पणजी : पुढारी वृत्तसेवा
मंदार सुर्लकर अपहरण व हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रोहन पै धुंगत, जोवितो रायन पिंटो आणि शंकर तिवारी या तिघांच्या अकाली सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाविरुद्ध गोवा सरकारने आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे.
गेल्या गुरुवारी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा १८ डिसेंबर २०२५ रोजीचा निर्णय रद्द केला होता.
या निर्णयाद्वारे सरकारने राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने केलेली तिघांच्या अकाली सुटकेची शिफारस नाकारली होती. राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, सरकारने आधीच अपील दाखल केले असून, पुढील सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध होणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.