पणजी : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चीत असलेल्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वाढली असून मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यात येत आहेत. यासाठीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार मायकल लोबो दिल्लीत दाखल झाले आहेत.
त्यांनी सोमवारी दिवसभर गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, भाजपचे संघटन मंत्री आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी बैठका घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. बैठकीत प्रामुख्याने मंत्रिमंडळातील फेरबदलावर भर देण्यात आला असून येत्या आठवड्याभरात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हे मोठे फेरबदल केले जातील अशी माहिती आहे. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, यानंतरच राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या असून भाजपमधील काही आमदारांनी मंत्रीपदाच्या इच्छेने आपली नाराजी व्यक्त केली होती, यात आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, सभापती रमेश तवडकर यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज आपल्या सहकार्यांसह केंद्रीय नेतृत्वांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यात संभाव्य नव्या मंत्र्यांची यादी, सध्याच्या मंत्र्यांच्या कामगिरींचे मूल्यमापन आणि आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी यासंबंधी चर्चा झाली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी माझी दीड तास चर्चा झाली. चर्चेत राजकीय विषय नव्हता. माझे मंत्रिपद ठेवायचे की काढायचे, याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असे मंत्री सिक्वेरा म्हणाले. पुढील आठवड्यात गोव्यात परतणार आहे आणि विधानसभा अधिवेशनात माझ्या खात्याविषयी प्रश्नांची उत्तरेही देईन, असे ते म्हणाले.
विद्यमान सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असून त्यांच्या रिक्त जागेवर जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी मंत्री शिरोडकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सभापती पदी कुणाची वर्णी लागणार याची अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री मायकल लोबो, आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, या चौघांची नावे निश्चित झाले असून केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या मंत्रीपदांना मंजुरी दिल्याची माहिती आहे.