मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आठवड्यापासून गेल्या मासळीची आवक वाढल्याने बाजारात ताजी मासळी उपलब्ध झाली आहे. यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नाताळ आणि नववर्षाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
विशेषतः खिस्ती बांधवांची मासळीसाठी मागणी वाढली आहे. सणासुदीच्या काळात मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय चांगलाच तेजीत असून दक्षिण गोवा बाजारात विविध मासळीचे दर वाढलेले दिसून येत आहेत.
इसवण मासळी ९५० रुपये किलो, तर टायगर प्रॉन्स ६०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कोळंबी २५० रुपये किलो, पापलेट ४०० रुपये किलो आणि तारले ४५० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. नाताळच्या निमित्ताने मासळी बाजारात मोठी उलाढाल झाली असून बांगडे मासळीला विशेष मागणी आहे.
सध्या २०० रुपयांत १० ते १५ बांगडे मिळत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मासळीच्या किंमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खरेदीवर होत असला तरी सणामुळे मागणी कायम आहे.
घाऊक मासळी बाजारात मोठी गर्दी...
रविवारी घाऊक मासळी बाजारात प्रचंड गर्दी दिसून आली. ख्रिस्ती बांधवांसह अन्य ग्राहकांनीही मासळी खरेदीस चांगला प्रतिसाद दिला. बाजारात कर्ली २५० वाटा, मुड्डोशो ३५० वाटा दराने विक्री होत असून सणासुदीच्या दिवसांत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.