मडगाव : पुढारी वृत्तसेवा
नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष, पर्यटन हंगामाचा कळस आणि अनुकूल हवामान यांचा त्रिवेणी संगम सध्या सासष्टी परिसरात पाहायला मिळत आहे. रॉक, हॉटेल्स, रिसॉर्टस् आणि घरोघरी रंगणाऱ्या पार्थ्यांमुळे मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार परिसर गजबजून गेला असून ग्राहकांच्या गर्दीन मासळी बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे.
रविवारी मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात पहाटे चार वाजल्यापासूनच खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते. या गर्दीमुळे बाजारात मोठी उलाढाल झाली असून मासळी विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसून आले.
सध्या बाजारात सुरमई मासळीचा दर पुन्हा एकदा वाढला असून प्रतिकिलो १००० रुपयांवर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी ८०० रुपयांपर्यंत खाली आलेले दर नववर्ष व पर्यटन हंगामामुळे पुन्हा वाढले आहेत. दर वाढले असले तरी दर्जेदार आणि ताजी मासळी उपलब्ध असल्याने ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले आहे.
बांगड्यांची चांगली आवक असून ३०० रुपयांमध्ये १० ते १५ बांगडे मिळत आहेत. तारले मासळीचे दर १०० रुपयांनी उतरले असून ती सध्या प्रतिकिलो ३०० रुपयांना विकली जात आहे. पापलेट ४०० रुपये किलो, कर्ली २५० रुपये वाटा, मुड्डोशो ३५० रुपये वाटा तर इसवण मासळीचा दर प्रतिकिलो १००० रुपये इतका आहे.
कोळंबी २५० रुपये किलो तर टायगर प्रावन्स प्रतिकिलो ५५० रुपये दराने विकले जात आहेत. दरम्यान, चिकन आणि मटणचे दर सध्या वाढलेलेच असल्यामुळे अनेक ग्राहकांचा कल मासळीच्या खरेदीकडे वाढला आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर चिकन आणि मटणचे दर काही प्रमाणात कमी होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
पापलेट १,००० रु., बांगडे २०० रु. किलो; पणजीत इसवण ६०० रु. किलो
पणजीत आज, रविवारी इसवण ६०० ते ७०० रु. किलो होता. पापलेट मात्र १,००० ते १,२०० रु. किलो दराने मिळत होते. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेले पर्यटक परतीच्या मार्गाला लागले आहेत. शिवाय राजधानीत मोठे इव्हेंटही नाहीत. त्यामुळे वाढलेली पर्यटकांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर माशांची आवक वाढल्याने दर थोडा कमी आहे. पूर्वी तो ८०० ते १,००० रु. किलो असा दर होता. मासळी बाजारात मोठा बांगडे २०० रु. किलो, तर छोटे १५० रु. किलो दराने मिळत आहेत. शिणाणे ५०० रु. किलो व ५०० रुपयांना वाटा असे मिळत होते. वाट्यामधील शिणाणे आकाराने लहान होते. तिसरे ५०० रु. ना १०० मिळत होते. मोडसो ४०० ते ५००
पणजी बाजारातील मासळीचा दर
-1-इसवण - ६०० रु. किलो, पापलेट १,००० ते १,२०० रु. किलो, सरंगा -मध्यम ५०० रु. किलो, मोठा ७००-८०० रु. किलो, प्राँस ३०० ते ५०० रु. किलो, बांगडे - २०० रु. किलो, तारले २०० रु. किलो, माणके मोठे ५०० रु. किलो, लहान १०० ते २०० रू., लेप २०० रु. वाटा, कर्ली १५०- २५० रु. नग, तारले १०० रु. वाटा.