पणजी : पुढारी वृत्तसेवा
कथित अबकारी खात्यातील नोकरी घोटाळाप्रकरणी संशयित अजित शंखवाळकर यांचा शोध घेण्यासाठी पणजी पोलिसांनी तसासाला वेग देताना त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटिस (एलओसी) जारी केली आहे. शेजारील राज्यात त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
सरकारी नोकरीची बनावट नियुक्तिपत्रे तयार करून तळेकर कुटुंबाची सुमारे १.२७ कोटींची फसवणूक केलेल्या संशयित अजित शंखवाळकर याचा बुरखा पणजी पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीतून उघड झाला आहे. तो सध्या नेमका कुठे आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू असून त्यांचा ठा ठिकाणा शोधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचाही वापर केला जात आहे.
त्याच्या अटकेनंतरच त्याने सरकारी कागदपत्रप्रमाणे हुबेहूब नियुक्तीपत्रे बनवण्यास कोणी मदत केली याचा छडा लागणार आहे. शंखवाळकर याचे जुन्या सचिवालयमागील परिसरात एक दुकान आहे ते सुद्धा बंद आहे.
त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. बनावट दस्तावेज तयार करण्यासाठी त्याने कोणत्या शासकीय अधिकाऱ्याची मदत घेतली आहे का हे स्पष्ट होण्यासाठी त्याची कोठडीतील चौकशीची आवश्यकता आहे, असे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शंखवाळकर यांच्या दोन बँक खात्यांवर कारवाई करत ती गोठवली आहेत.