पणजी : गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त प्रयत्नांतून एका अट्टल मद्य तस्कराला पकडण्यात गोवा पोलिसांना यश आले. प्रफुल्ल ऊर्फ पप्पू बहूसाहेब यादव (रा. सिन्नर, जि. नाशिक, महाराष्ट्र) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पालये-पेडणे येथून वाहनासह (एम एच 06 एस 9011) अटक करण्यात आली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, दारू तस्कर पप्पू यादव निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहे. या माहितीच्या आधारे गोवा विभाग गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल महाबळेश्वर सावंत, सायमुल्ला मकानदार आणि गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल रूपेश गायकवाड यांचा समावेश असलेल्या पथकाने तत्काळ कारवाई केली आणि सिंधुदुर्ग गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांना मदत केली. दोन्ही राज्यांतील गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पप्पू यादव याला अटक केली.
पप्पू यादव याचा एकूण 5 प्रकरणांमध्ये सहभाग आहे. सिन्नर, इंदिरानगर, उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्य प्रतिबंधक 2006, 2018, 2023 या तीन वर्षांतील महाराष्ट्रातील तीन प्रकरणे अशा एकूण पाच प्रकरणांत त्याचा सहभाग आहे. महाराष्ट्र पोलिसांशी समन्वय साधून त्याचे गोव्यातील संबंध समजून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.