Leopard Terror : गंगापूर तालुक्यात बिबट्यांची दहशत pudhari
गोवा

Leopard Spotted Deolali Camp | लॅम रोडवर बिबट्याची दहशत; सीसीटीव्हीत थरार कैद विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न

Leopard Spotted Deolali Camp | ऐरणीवर : झाडीझुडपे हटविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा


देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
लॅम रोड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्गावरील मविप्रच्या आदर्श शिशुविहार परिसरात बिबट्याचा वावर उघडकीस आल्याने देवळाली कॅम्प परिसर हादरला आहे. लॅम रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळील 'आदर्श शिशुविहार' शाळा प्रांगणात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गुरुवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ च्या सुमारास बिबट्या शाळेच्या आवारात भक्ष्य शोधत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरताच विद्यार्थी व पालकांसह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळा आणि मंदिर परिसरासभोवताली दाट झाडी आणि झुडपे वाढल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. त्यामुळे वन विभाग आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबवून ही झाडीझुडपे तातडीने हटवावीत अशी मागणी होत आहे.

दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात दोन दिवसांपूर्वीच पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्या पिंजऱ्या भोवताली फिरून निघून जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

"शाळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने आम्ही तातडीने खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. वनविभाग व शाळा प्रशासनाला माहिती दिली आहे. येथे पिंजरा लावण्यात आला आहे. विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे."
- वनिता भोईर, मुख्याध्यापक, आदर्श शिशु बिहार

रात्री घराबाहेर पडणे धोकादायक

या घटनेमुळे परिसरातील गुज्जरती सोसायटीसह लॅम रोड भागातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या भीतीपोटी नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासाठी धजावत नाहीत. प्रशासनाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव हारक, सरचिटणीस बाळासाहेब खातळे, श्रीधरपंत धुर्जड, संपत सातपुते, सोमनाथ खातळे, बब्बू गोडसे, माधव गोडसे, सागर गोडसे यांच्यासह पालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT