बिबट्या pudhari
गोवा

Wildlife Conflict Goa | गोव्यात वन्यप्राण्यांच्या संचाराने दहशत; हरमलमध्ये पहिल्या मजल्यावर चढून बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

Wildlife Conflict Goa | स्थानिकांना धोका : वन खात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

फोंडा/हरमल/पेडणे : पुढारी वृत्तसेवा
खाजगी वनक्षेत्रे नष्ट करून वसाहती उभ्या राहत आहेत. विकासाच्या नावाखाली वारेमाप झाडे आणि डोंगर कापणी होत असल्याने जंगली जनावरे लोकवस्तीत येत आहेत. गवे रेडे, बिबटे आणि इतर हिंस्त्र श्वापदे लोकवस्तीत शिरत असल्याने स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे.

हरमल वरचावाडा आणि नानोसकरवाडा परिसरात बिबट्याने घराच्या पहिल्या मजल्यावरील पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याचा फडशा पाडला. आता त्यात भर म्हणून 'ओंकार' हत्तीनेही गोव्याकडे मोर्चा वळवला आहे.

वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने समाजमन धास्तावले आहे. फोंड्यातील कुर्टी आणि ढवळी परिसरात गव्यांचे कळपच राजरोसपणे फिरत असल्याने वन खात्याने या गव्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. गेल्याच आठवड्यात कुर्टी - बेतोडा बगल रस्त्यावर गव्यांचा कळप अचानक रस्ता पार करताना समोरून आलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुचाकीस्वार महिला जखमी झाली होती. गेल्या दीड वर्षाच्या काळात बेतोडा भागात दोघांना गव्याने शिंगावर घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

आठ महिन्यांपूर्वी सावईवेरे भागात एका शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी वन खात्यासह इतर सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक बोलावून गव्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. मात्र, गव्यांचा मुक्त संचार फोंडा तालुक्यात सुरूच असून लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन खात्याकडून गव्यांना हुसकावून लावण्यासाठी गस्त सुरू असल्याची माहिती वनाधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

हरमल येथे बिबट्याचा थरार

हरमल वरचावाडा आणि नानोसकरवाडा परिसरातील ग्रामस्थ बिबट्याच्या भीतीखाली वावरत असून, सायंकाळी पाचपूर्वीच घरात परतण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने घराच्या पहिल्या मजल्यावरील पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी (दि. २२) रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास अंगणात कुत्रा भुंकत असल्याचे घरमालक उल्हास नाईक यांच्या निदर्शनास आले. काही वेळातच कुत्रा पहिल्या मजल्यावर धावला. त्याच्या पाठोपाठ बिबट्यानेही पहिल्या मजल्यावर धाव घेतली. कुत्र्याने पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.

'ओंकार' पुन्हा गोव्यात

'ओंकार' हत्तीने अखेर रविवारी गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला. कळशी-मोप परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT