गोवा

Goa bike hits leopard | दुचाकीची बिबट्याला धडक; भाऊ-बहीण जखमी

कारापूर-सर्वणमधील घटना; वाहनचालकांसह नागरिकांत भीती

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : तालुक्यातील कारापूर-सर्वण हमरस्ता परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आणि दुचाकीची धडक होऊन भाऊ-बहीण जखमी झाले. या घटनेमुळे वाहनचालकांसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली येथील भाऊ-बहीण घोडे मोडणी उत्सव पाहण्यासाठी आले होते. ते दुचाकीवरून रात्री हरवळेच्या दिशेने जात असताना हमरस्त्यावर बसलेल्या बिबट्याला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. धडकेनंतर बिबट्या काही वेळ रस्त्यावरच पडून राहिला; मात्र काही वेळाने तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने साखळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

उपचारानंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, डिचोली तालुक्यातील कुडणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला आहे. तसेच राधानगरबोर्ड परिसरातही बिबट्याचा वावर असल्याने काही दिवसांपूर्वी तेथे सापळा लावण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT