पणजी : पुढारी वृत्तसेवा
बेळगाव, शिर्डी, कोल्हापूर अशा ठिकाणाहून पर्यटकांना येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेद्वारे दिल्या जाणार्या हवाई सेवेचा फायदा होऊ शकतो. अशी शहरे या सेवेद्वारे जोडली जाऊ शकतात, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या हेली सेवेचा शुभारंभ केला. आग्वाद किल्ल्यावर हवाई सेवा देणार्या ब्लेड या खासगी संस्थेद्वारे सुरू झालेल्या हेली ट्युरिझम सेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ब्लेड या कंपनीचे संचालक सनी गुगलानी, करणपाल सिंग व पायल सिंग यांची उपस्थित होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, वर्षाला 80 लाख पर्यटक गोव्यात येत असतात. राज्यातील अनेक अशी ठिकाणे आहेत, की त्याठिकाणी पर्यटक पोहोचलेले नाहीत, त्यांनाही अशा ठिकाणी जावावेसे वाटते. अशा हवाई सेवांसाठी जर राज्य सरकारच्या काही परवानग्या लागणार असतील, तर आम्ही त्या देऊ. दाबोळी विमानतळावरून उत्तर गोव्यात येण्यासाठी हेलिकॉप्टरने केवळ 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. याशिवाय अशा हवाई सेवेचा आरोग्यसेवेसाठीही भविष्यात उपयोग होणार असल्याचे ते म्हणाले.
सनी गुगलानी म्हणाले की, गोव्यातील सौंदर्य सर्वांना भुलावत असते. त्यामुळे येथील नैसर्गिक स्थळांचे दर्शन हेलिकॉप्टर सेवेद्वारे पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. येथील किनारे, किल्ले, धबधबे आणि मंदिरांचे सौंदर्य हवाई सेवेतून पहायला मिळणार आहेच शिवाय त्याद्वारे अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य आर्थिक विकास महामंडळाचे व्हाईस चेअरमन संजय सातार्डेकर म्हणाले की, राज्यातील पर्यटनासाठी आजचा दिवस हा सुवर्णमय आहे. पर्यटनामध्ये विविध सेवा सुविधा आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्यावतीने केले जात आहेत. लाखो पर्यटक गोव्यात येत असतात, त्यात उच्चभ्रू आणि कमी उत्पादन गटातीलही पर्यटकांचाही समावेश असतो.
गोवा देशातील पर्यटकांचे एक आवडीचे ठिकाण आहे. देशातील पहिली हेली ट्युरिझम सेवा गोव्यात सुरू होत आहे, त्याचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावे लागेल. आपणास वाटते की हेली ट्युरिझम सेवेमुळे इतर चांगल्या सुविधाही गोव्यात येतील, असेही त्यांनी सिंग यांनी सांगितले.
शेजारील राज्यांतील विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यास त्याठिकाणी गोव्यातून हेलिकॉप्टर सेवा सुरू होईल. त्याचा फायदा तेथून गोव्यात येणार्या पर्यटकांनातर होईलच, पण अनेकांचा वेळही वाचेल आणि त्याचबरोबर पर्यटकही वाढतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आपण जमिनीवरून गोवा पाहतो, परंतु हवाई सेवेद्वारे दिसणारे गोवा फारच सुंदर आहे, हे आपण पहिल्या फेरीतून पाहिल्याचे नमूद केले.