landslide Pudhari
गोवा

Vasco Landslide News | सडा ते मुरगाव मार्गादरम्यान दरडीचा धोका वाढला

Vasco Landslide News | उपाययोजनेचे प्रयत्न सुरू असल्याची आमदार आमोणकर यांची माहिती, कामावरून कंत्राटदारावर रोष

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

सडा ते मुरगाव दरम्यान रविवारी पुन्हा दरड कोसळल्याने सदर भाग चर्चेत आला आहे. याठिकाणी वारंवार दरडी कोसळत असल्याने तेथे त्वरित उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आम्हाला लोकांची सुरक्षितता महत्वाची आहे. येथे आणखी दरडी कोसळ्याची भीती असल्याने योग्य उपाययोजना करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर दरडी कोसळण्याचा प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगाव बंदरात क्रूझ टर्मिनल बांधण्यात येत आहे. त्यामुळे तेथील वाहतूक वाढणार असल्याने सडा ते मुरगाव दरम्यानचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज भासली आहे. त्यानुसार तेथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी डोंगरकापणी करण्यात येत आहे. ते योग्य पध्दतीने कापण्यात येत नसल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.

महिन्यापूर्वी एका ठिकाणी काम सुरू असताना अचानकपणे मोठी दरड कोसळून त्याखाली सापडून मनोरंजन निंद नावाचा कामगार मरण पावला होता. तर आणखी एक कामगार जखमी झाला होता. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी कंत्राटदार व सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी ३-४ दिवसांपूर्वी पाहणी केली होती. याप्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तथापी रविवारी या मार्गावर पुन्हा दरड कोसळून मोठे खडक, माती रस्त्यावर आली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

तेथे कोणी अपघातात सापडू नयेत यासाठी तेथे पिंपे ठेवण्यात आली आहेत. काम चालू असल्याचा फलक लावण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार आमोणकर यांनी तेथील रस्ता रुंदीकरण कामासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. मुरगाव बंदरात कूझ टर्मिनल बांधण्यात येत आहे. त्यासाठी तेथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरणाने प्रस्ताव दिला होता.

त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तेथे रस्त्याचे रुंदीकरणासाठी कंत्राट दिले आहे. तेथील रस्ता रुंदीकरणासाठी ३५० झाडे कापण्याची परवानागी वनखात्याने दिली होती. तथापी याप्रकरणी आपणास माहिती मिळताच आपण जातीने पाहणी केली. त्यानंतर मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावत यांनीही पाहणी केली. त्यामुळे रस्ता रुर्दीकरणासाठी फक्त ३८ झाडे कापण्याची गरज भासली असे आमोणकर म्हणाले.

कंत्राटदाराला कामाचा अनुभव नाही

संबंधित कंत्राटदार योग्यरित्या काम करीत नसल्याने आपण त्याचे काम बंद ठेवले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्या कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वी सदर काम करण्याचे आश्वासन दिल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्याने कामाला वेग दिलाच नाही. त्याला संबंधित कामाचा अनुभव नसल्याचे दिसून येते, असे आमदार आमोणकर यांनी सांगितले.

भविष्यात आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित सडा ते मुरगाव बंद होण्याची भीती आहे. सदर घटना घडू नये यासाठी माझे प्रयत्न आहेत.
- संकल्प आमोणकर, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT