Lairai Devi Jatra Shirgao Goa  pudhari photo
गोवा

Lairai Devi Jatra Shirgao Goa |भक्तांची मायमाऊली देवी लईराई

भक्तांची मायमाऊली देवी लईराई

पुढारी वृत्तसेवा

-श्रीराम च्यारी

दरवर्षी वैशाख शु. पंचमीला देवी लईराईचा जत्रोत्सव शिरगावात मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो. श्रीदेवी लईराईच्या मंदिराला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. भाविकांच्या हाकेला पावणारी देवी लईराई म्हणून भाविक श्रद्धेने देवी लईराईच्या जत्रोत्सवाला हजारोच्या संख्येने हजेरी लावतात.

श्री लईराई देवीच्या मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. लालखी उत्सव, श्रावणी सोमवार, कालोत्सव, गवळणकाला असे विविध कार्यक्रम वर्षभर साजरे होतात. देवी लईराईचा कौलप्रसाद वर्षभर चालू असतो. भाविक मोठ्या भक्तीभावाने देवीला कौलप्रसाद लावून आपल्या अडीअडचणींचे निरसन करतात. देवीचा कौलप्रसाद घेऊन अनेक व्यावसायिक आपले नवीन व्यवसाय सुरू करतात. देवी लईराईच्या आशीर्वादामुळे व्यावसायात भरभराट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री लईराई देवीचे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांना वेळोवेळी दृष्टांत देऊन देवीने आशीर्वाद दिले आहेत. देवी लईराईच्या भक्तांची श्रद्धा असल्यामुळे दर मंगळवारी भाविक देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविक कुटुंबाला देवीच्या दृष्टांताचा अनुभव आल्याचे एका कुटुंबीयांनी सांगितले.

मंगळवारी देवी लईराईचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर मुख्य दरवाजाला कडी आतून लागल्यामुळे दरवाजा बंद झाला. सर्व कुटुंबीय दरवाज्याला चावी करून देवी लईराईच्या दर्शनासाठी गेले होते. मुख्य दरवाजाची चावी हातात असूनही आतून कडी असल्यामुळे दरवाजा उघडणे शक्य नव्हते. शेवटी कारपेंटरला बोलावून दरवाज्याची कडी कापून दरवाजा उघडावा, असे ठरले. घरातील कुटुंबीयांनी श्रीदेवी लईराईला मनोमन भक्ती भावाने नमस्कार करून दर्शनात काही चूक झाल्यास क्षमा करावी, असे गाऱ्हाणे घातले व कारपेंटरची वाट पाहत व्हरांड्यात बसून राहिले.

रात्रीची वेळ होती. त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणून मुख्य दरवाजाला चावी लावून दरवाजा ढकलण्यात आला आणि आपोआप दरवाजा उघडला गेला. या प्रसंगामुळे कुटुंबीयांना देवीची प्रचिती आली. कुटुंबीय दर मंगळवारी देवी लईराईच्या मंदिरात जाऊन भक्तीभावाने प्रार्थना करतात. असे अनेक प्रसंग दृष्टांत देवी लईराईच्या भक्तांनी अनुभवले आहेत. यावर्षी देवी लईराईच्या जत्रोत्सवात कोणत्याही अडीअडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सरकारी पातळीवर शासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT