पणजी : शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने पुढील वर्षाच्या जत्रोत्सवासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाला सुरुवात केली आहे.
देवीच्या धोंडांकडून पासपोर्ट साईजचे 2 फोटो आणि आधारकार्ड मागविण्यात आले आहे. ज्या आधारे समिती या धोंडांची नोंदणी करणार आहे. यामुळे जत्रेचे नियोजन करणे सोपे होणार आहे. या संदर्भातील नोटीस देवस्थानने जारी केली आहे.
देवीचे नेमके धोंड किती आहेत, याबाबतची अधिकृत तपशीलवार माहिती देवस्थान समितीकडे नाही. त्यामुळे समिती आणि प्रशासनाला संपूर्ण जत्रेचे नियोजन करण्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येतात. हे आता स्पष्ट झाले आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती.
दुर्घटनेची माहिती मिळवण्यासह भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून, या संदर्भातील सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे.
सध्याच्या देवस्थान समितीने जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीला प्रशासनाला जबाबदार धरले आहे, तर जुन्या देवस्थान समितीने नव्या देवस्थान समितीला जबाबदार धरले आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता विद्यमान समितीने पुढील जत्रेच्या काटेकोर नियोजनासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिताच धोंडांची नोंदणी करण्यात येत आहे.