death  
गोवा

Labourer dies after assault over stolen Bullet | चोरीची बुलेट सापडली तरी मारहाण सुरूच; मजुराचा मृत्यू

चोरीची बुलेट सापडली तरी मारहाण सुरूच; मजुराचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : दक्षिण गोव्यातील नुवे येथे बुलेट चोरीच्या संशयातून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला जमावाने माडाच्या झाडाला दोरीने बांधून केलेल्या बेदम मारहाणीत एका मजुराचा नाहक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामा ज्ञानोबा सुरडकर (वय ३७, रा. धाराशिव-महाराष्ट्र) असे त्याचे नाव आहे. चोरीला गेलेली बुलेट शोधून दिल्यानंतरही जमावाने निर्दयीपणे मारहाण सुरूच ठेवली. त्याची शुद्ध हरपल्यानंतरही लाथाबुक्क्या, दोरी आणि हाताला मिळेल त्या वस्तूंनी त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला. या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी मायणा-कदतरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण दक्षिण गोवा हादरला आहे. रामा सुरडकर हा अनेक वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होता. सुरावली परिसरात तो रोजंदारीवर विविध कामे करून उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपूर्वी सुरावली परिसरातून एका व्यक्तीची बुलेट मोटारसायकल चोरीला गेली होती.

बुलेट मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक मध्यमवयीन व्यक्ती बुलेट घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीचा शोध घेत असताना रामा सुरडकर हा सुरावली येथे आढळून आला आणि त्याच्यावर जमावाने संशय व्यक्त केला. रामाची चौकशी करण्यात आली असता सुरुवातीला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, जमावाने त्याला जबरदस्तीने सोबत घेतले.

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमाव रामाला घेऊन चार ठिकाणी गेला. प्रत्येक ठिकाणी बुलेटचा शोध घेण्यात आला. अखेर रामाला नुवे येथे नेण्यात आले. तेथे ती बुलेट सापडली. सुरुवातीला बुलेट मिळाल्यानंतर तुला सोडून देऊ, असे रामाला सांगण्यात आले होते. मात्र बुलेट मिळताच जमावाने हाताला मिळेल त्या वस्तूंनी, दोरीने तसेच लाथाबुक्क्यांनी त्याच्यावर बेछूट हल्ला चढवला. गंभीर जखमांमुळे रामा वेदनेने मोठमोठ्याने ओरडत होता, परंतु उपस्थितांपैकी कोणालाही त्याची दया आली नाही. रामाला माडाच्या झाडाला दोरीने बांधण्यात आले. त्याला निर्दयीपणे मारहाण सुरूच ठेवली. मारहाणीमुळे काही वेळातच त्याची शुद्ध हरपली. त्यानंतरही त्याला मारहाण सुरूच होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

रामाची प्रकृती गंभीर झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुलेट मालकाने कोलवा पोलिसांना चोर सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT