वाळपई : पुढारी वृत्तसेवा
ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील रिवे-गोळावली येथे कदंबा वाहतूक महामंडळाच्या बसचालक व कंडक्टरवर सुरीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर कदंब कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या चार दिवसांपासून या भागात जाणारी कदंब प्रवासी बससेवा बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सरकारी कर्मचारी आणि नियमित प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बससेवा पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्याची मागणीही जोर धरत आहे.
या प्रकरणी बसचालक अजित गावस आणि कंडक्टर प्रताप गावकर यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सदर घटना अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप संबंधित संशयितावर कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून कदंब महामंडळाची प्रवासी बस संध्याकाळच्या वेळी रिवे-गोळावली येथे येते.
सकाळच्या वेळी ही बस विद्यार्थ्यांसह सरकारी कर्मचारी आणि इतर प्रवाशांना घेऊन वाळपई तसेच आसपासच्या भागात येते. या बसचे चालक व कंडक्टर रात्रीच्या वेळी गावातील मंदिरात विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले. चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे बस रिवे-गोळावली येथे पोहोचल्यानंतर बसचालक अजित गावस आणि कंडक्टर प्रताप गावकर यांनी मंदिरात रात्रीची विश्रांती घेतली.
मध्यरात्री अनन्या सडेकर नावाचा युवक मंदिरात आला आणि तिथे झोपलेल्या कदंब कर्मचाऱ्यांच्या दिशेने पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अचानक जाग आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रतिकार केला असता संबंधित युवक तेथून निघून गेला. त्यानंतर तो घरी जाऊन सुरी घेऊन पुन्हा मंदिरात आला आणि कदंब कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागला. यावेळी त्याने कर्मचाऱ्यांवर सुरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्या दिवशी बसचालक अजित गावस आणि कंडक्टर प्रताप गावकर या दोघांनीही संपूर्ण घटनेबाबत वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी सदर प्रकरण अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविल्याचे सांगण्यात येत आहे.
कदंब कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय पुन्हा बससेवा सुरू करणे कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कदंब कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही पोलिसांशी संपर्क:
या घटनेची माहिती कदंब कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरूनही वाळपई पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. प्रकरण गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते. मात्र, प्रकरण अदखलपात्र म्हणून नोंद झाल्याने पुढील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.