पणजी: पुढारी वृत्तसेवा
डॉ. केतन भाटीकर यांनी मंगळवार, दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमात ते त्यांच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करतील, गेल्या काही दिवसांपासून अनेक एकतर्फी कथने पसरवली जात आहेत आणि सर्व शंका दूर करण्याचा त्यांचा मानस आहे.
भाटीकर म्हणाले की, फोंडाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांनी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, आणि आता त्यांना विरोध करणारे त्यांचे काम पाहून त्यांना नक्की पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला.
फोंडा येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचा भाटीकर यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचे सांगण्यात येत होते.त्याबाबत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही स्पष्ट भूमिका मांडली नव्हती.त्यामुळे भाटीकर यांचा पक्षप्रवेश होणार की लांबणार याबद्दल तर्कवितर्क सुरू होते.त्यावर खुद्द भाटीकर यांनीच पक्षप्रवेशाचीं अधिकृत घोषणा करून पडदा टाकला आहे.