Goa news  
गोवा

Goa news | कला अकादमीचा दर्जा उंचावणार

अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर; अकादमीचा ४६ वा वर्धापन दिन उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य घटक असलेल्या कला अकादमीचा वर्धापन दिन साजरा करणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. १९७० साली प्रख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली पाच दशके गोव्याच्या कला आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत आहे. कला अकादमी ही सर्व गोमंतकीयांची ओळख आहे. पूर्वीप्रमाणेच अकादमीचा दर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी दिली.

पहिल्यांदाच आयोजित केलेल्या वर्धापन दिनानिमित्त कला अकादमीच्या कृष्ण कक्षात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य सचिव शंकर गावकर, प्रेमानंद पोळे, स्वप्ना नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

अकादमी कला शिक्षणाचे केंद्र...

चंद्रकांत कवळेकर म्हणाले, कला अकादमी ही केवळ सादरीकरणाची संस्था नसून गोव्यातील कला शिक्षणाचे केंद्र आहे. अनेक वर्षे बंद असलेल्या विविध उपक्रमांना पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. आमचा रेपेर्टरी विभाग पुन्हा कार्यान्वित झाला असून ‘धरती आभा’ या नाटकाचे सादरीकरण राष्ट्रीय नाट्य विद्यालय आयोजित ‘आदी रंग महोत्सवा’त दिल्ली येथे झाले. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

सदस्य सचिव शंकर गावकर म्हणाले, कला अकादमी ही केवळ एक संस्था नसून गोव्याच्या कलात्मक अस्मितेचे प्रतीक आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कला शिक्षणाला चालना देणे आणि विविध सांस्कृतिक परंपरांचा वारसा जपणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कला अकादमीच्या विविध कला शाखांतील विद्यार्थ्यांनी आणि कलाकारांनी नृत्य, संगीत, नाट्य आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच उत्कृष्ट कार्य केलेल्या अकादमीच्या २० अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT